मुख्य मजकुराकडे जा
, ३ नोव्हेंबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
ब्रेकिंग
पुणे-पिंपरी-चिंचवड ठरणार देशातील प्रमुख ‘मोबिलिटी हब’; शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोमुळे आयटीयन्सना मोठा दिलासा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुणे आरटीओ कार्यालयासमोर ‘निर्भीड वर्तमान फाउंडेशन’चे आमरण उपोषण सुरू; पहिल्याच दिवशी प्रशासनाचे धाबे दणाणले!हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासकीय पावले वेगाने; सहा डीपी रस्त्यांच्या भूसंपादनासह टीडीआर प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन: चैत्यभूमीवर १ डिसेंबरपासूनच सर्व सुविधा सज्ज ठेवा; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निर्देश‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रगती मंडळ’ पुणे स्टेशनच्या नूतन विरंगुळा व विसावा केंद्राचे दिमाखात उद्घाटन
महाराष्ट्र

पुणे आरटीओ कार्यालयासमोर ‘निर्भीड वर्तमान फाउंडेशन’चे आमरण उपोषण सुरू; पहिल्याच दिवशी प्रशासनाचे धाबे दणाणले!

पुणे आरटीओसमोर निर्भीड वर्तमान फाउंडेशनचे ३ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण. एलपीजी वाहतूक सुरक्षेसाठी तपासणी व लेखी कारवाई आराखड्याची मागणी.

✍
4 मिनिटे वाचन

पुणे: पुणे शहरात घरगुती व व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरची कालबाह्य, विना-फिटनेस आणि नियमबाह्य वाहनांतून होणारी जीवघेणी वाहतूक रोखण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) अपयशी ठरल्याचा आरोप करत, ‘निर्भीड वर्तमान फाउंडेशन’च्या वतीने आज, मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ पासून पुणे आरटीओ कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी सामाजिक आणि नागरी वर्तुळातून मोठा पाठिंबा मिळाला असून, आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे आरटीओ प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

एलपीजी वाहतूक सुरक्षेबाबत फाउंडेशनकडून प्राप्त छायाचित्र 1: गॅस वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या तीनचाकी वाहनाचे छायाचित्र.
गॅस वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या तीनचाकी वाहनाचे छायाचित्र. छायाचित्र: फाउंडेशनकडून प्राप्त.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आंदोलनाचा पवित्रा

पुणे शहरात रस्त्यांवर धावणाऱ्या गॅस वितरण वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र (Fitness Certificate), विमा आणि पीयूसी नसणे, गॅस वाहतुकीसाठी आवश्यक वायुवीजन (Ventilation) नसलेली धोकादायक बंद पत्र्याची बॉडी असणे, अग्निशामक उपकरणांचा अभाव तसेच चालकांकडे धोकादायक मालवाहतुकीचा (Hazardous Goods) परवाना नसणे अशा अत्यंत गंभीर बाबी समोर आल्या होत्या.

आमरण उपोषण

या जीवघेण्या प्रकाराबाबत निर्भीड वर्तमान फाउंडेशनचे संस्थापक-संचालक आयु. श्रीकांत दारोळे यांनी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी आरटीओ प्रशासनाकडे पुराव्यानिशी लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी स्मरणपत्र देऊन प्रशासनाला कारवाईचा लेखी कृती आराखडा सादर करण्यासाठी २ नोव्हेंबरपर्यंतची अंतिम मुदत दिली होती. मात्र, निष्पाप पुणेकरांच्या जिवाशी खेळ सुरू असतानाही आरटीओ अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई अथवा तपासणी मोहीम न राबविल्याने अखेर आजपासून हे शांततामय मार्गाने आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

एलपीजी सिलिंडरच्या असुरक्षित वाहतुकीविरोधातील उपोषणाच्या प्रमुख मागण्यांचा फाउंडेशनने दिलेला बॅनर
प्रमुख मागण्या व उपोषणाची माहिती — फाउंडेशनकडून प्राप्त बॅनर.

उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या:

१. कालबाह्य व अनफिट वाहने स्क्रॅप करा: वय संपलेली, नापास झालेली आणि योग्यता प्रमाणपत्र नसलेली सर्व गॅस वाहने तात्काळ जप्त करून त्यांची नोंदणी रद्द (स्क्रॅपिंग) करण्याचे आदेश द्यावेत.

आमरण उपोषण

२. बंदिस्त वाहनांचे परवाने रद्द करा: वायुवीजन नसलेली, बेकायदेशीरपणे बंद पत्र्याची बॉडी तयार करून फिरणाऱ्या वाहनांचे वाहतूक परवाने जागेवरच रद्द करावेत.

एलपीजी वाहतूक सुरक्षेबाबत फाउंडेशनकडून प्राप्त छायाचित्र 5: बंद बॉडीच्या मालवाहू वाहनाचे समोरील दृश्य.
बंद बॉडीच्या मालवाहू वाहनाचे समोरील दृश्य. छायाचित्र: फाउंडेशनकडून प्राप्त.

३. चालक व गॅस एजन्सींवर फौजदारी कारवाई: विशेष प्रशिक्षण व परवान्याशिवाय चालकांकडून वाहने चालवून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या संबंधित गॅस एजन्सी मालकांवर व चालकांवर आरटीओने थेट गुन्हे दाखल करावेत.

स्वप्निल जगताप व ज्ञानेश्वर आखाडे यांच्या उपोषणाची माहिती असलेला फाउंडेशनचा बॅनर
एलपीजी वाहतूक सुरक्षेसाठी उपोषण — फाउंडेशनकडून प्राप्त बॅनर.

४. एजन्सींचे व्यावसायिक परवाने निलंबित करा: नियमभंग करणाऱ्या गॅस एजन्सींची जबाबदारी निश्चित करून त्यांचे वाहतूक परवाने निलंबित करावेत.

५. स्वतंत्र नियंत्रण कक्ष व नोडल अधिकारी: रस्त्यांवर नियमबाह्य वाहने दिसल्यास नागरिकांना व कार्यकर्त्यांना थेट माहिती देण्यासाठी आरटीओने स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावा व त्यांचा संपर्क क्रमांक जाहीर करावा.

एलपीजी वाहतूक सुरक्षेबाबत फाउंडेशनकडून प्राप्त छायाचित्र 8: मागील दार उघडे असताना वाहनातील सिलिंडरची मांडणी.
मागील दार उघडे असताना वाहनातील सिलिंडरची मांडणी. छायाचित्र: फाउंडेशनकडून प्राप्त.

६. लेखी कृती अहवाल व वेळापत्रक द्या: १२ ऑक्टोबरपासून आजपर्यंत आरटीओने किती वाहनांवर कारवाई केली याचा अधिकृत स्वाक्षरीसह अहवाल द्यावा आणि शहरातील सर्व वाहनांच्या १००% तपासणीचे लेखी वेळापत्रक जाहीर करावे.

आरपारची लढाई; माघार नाही!

आज पहिल्या दिवशी फाउंडेशनचे पुणे शहर उपाध्यक्ष आयु. स्वप्निल जगताप आणि पुणे उप जिल्हाध्यक्ष आयु. ज्ञानेश्वर आखाडे हे प्रत्यक्ष आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ व हक्काच्या या लढ्यात पुणे जिल्हाध्यक्ष आयु. फिरोज शेख हे देखील पूर्ण वेळ सोबत उपस्थित राहून ठामपणे पाठीशी उभे आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका मांडली की, “जोपर्यंत आरटीओच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह ठोस कारवाई सह लेखी आदेश आणि कृती आराखडा दिला जात नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही. उपोषणकाळात उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीस काही अपाय झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आरटीओ प्रशासनाची असेल,” असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनाची प्रत परिवहन आयुक्त (महाराष्ट्र राज्य), पुणे जिल्हाधिकारी, पुणे पोलीस आयुक्त आणि बंडगार्डन पोलीस ठाण्याला अग्रेषित करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी आंदोलनाला परिसरातील नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला असून, आता आरटीओ प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण पुणे शहराचे लक्ष लागले आहे.

#पुणेआरटीओ #एलपीजीसुरक्षा #निर्भीडवर्तमान

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , , , , , ,

संबंधित बातम्या

हिंजवडी वाहतूक कोंडी आणि सहा डीपी रस्त्यांच्या विकासाचे AI निर्मित प्रातिनिधिक चित्र; निर्भीड वर्तमान लोगो

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.