‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रगती मंडळ’ पुणे स्टेशनच्या नूतन विरंगुळा व विसावा केंद्राचे दिमाखात उद्घाटन
रिपाइं युवक अध्यक्ष शैलेंद्रभाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त लोकार्पण; सामाजिक उपक्रम व प्रवाशांना होणार मोठा लाभ

रिपाइं युवक अध्यक्ष शैलेंद्रभाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त लोकार्पण; सामाजिक उपक्रम व प्रवाशांना होणार मोठा लाभ
पुणे (विशेष प्रतिनिधी) :
सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ परंपरा असलेल्या व १९५७-५८ मध्ये स्थापन झालेल्या पुणे स्टेशन येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रगती मंडळ’ यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या नूतन विरंगुळा व विसावा केंद्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. रिपाइं युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शैलेंद्रभाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या नूतन वास्तूचे लोकार्पण करण्यात आले.
स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून या विरंगुळा व विसावा केंद्राची अद्ययावत उभारणी करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून केंद्राचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी रिपब्लिकन, फुले, शाहू आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी शैलेंद्रभाऊ चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सामाजिक कार्याला गती व प्रवाशांना विसावा
स्थापनेपासून गेली अनेक दशके अविरतपणे सामाजिक कार्यात कार्यरत असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रगती मंडळ’ या संस्थेला या नव्या वास्तूमुळे मोठा आधार मिळाला आहे. या केंद्रामुळे परिसरातील सामाजिक उपक्रम, बैठका आणि जनसंपर्काला मोठी गती मिळणार आहे. त्याचबरोबर पुणे रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या दूरदूरच्या प्रवासी बांधवांना, ज्येष्ठ नागरिकांना तात्पुरत्या विसाव्यासाठी या सुसज्ज केंद्राचा मोठा फायदा होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, मंडळाचे पदाधिकारी आणि आंबेडकरी चळवळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही बातमी कशी वाटली?
टॅग: पुणे





प्रतिक्रिया व्यक्त करा