मुठा व मोसे खोऱ्यातील ३०० आदिवासी कुटुंबांना ब्लँकेट, फराळ वाटप; टेमघर येथे विविध विकासकामांचे थाटात उद्घाटन
टेमघर ग्रामपंचायतीच्या उपक्रमात किराणा किट, सोलर इन्व्हर्टर व चारा बियाणे वाटप; पाणीपुरवठा योजना, आधार केंद्र आणि जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

टेमघर;
(विशेष बातमी प्रतिनिधी: ज्ञानेश्वर आखाडे)
मुठा व मोसे खोऱ्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या सुमारे ३०० आदिवासी बांधवांना दिवाळीनिमित्त ब्लँकेट व मिठाई-फराळाचे वाटप करण्यात आले. टेमघर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या सामाजिक उपक्रमासह विविध विकासकामांचा भव्य उद्घाटन सोहळा भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर आणि जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.

टेमघर ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन मारुती मरगळे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून गावात एकाच वेळी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये दिवाळीचे औचित्य साधून आदिवासी बांधव तसेच टेमघरमधील ८० कुटुंबांना किराणा किट व मिठाईचे वाटप करण्यात आले. गावातील विजेची समस्या लक्षात घेऊन ३० कुटुंबांना सोलर इन्व्हर्टरचे वाटप करण्यात आले, तर स्थानिक शेतकरी बांधवांना शासनाच्या योजनेअंतर्गत चारा बियाणे उपलब्ध करून देण्यात आले.

या सोहळ्यात आमदार शंकर मांडेकर व शांताराम इंगवले यांच्या हस्ते टेमघर नळ पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात आले. याशिवाय ग्रामस्थांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेले नवीन आधार केंद्र आणि सरपंच सचिन मरगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. टेमघरमधील नागरिकांना सरंजाम व मिठाई वाटप करून सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

‘गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही’ — आमदार शंकर मांडेकर
उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले की, “ग्रामीण व दुर्गम भागाचा सर्वांगीण विकास करणे हेच आपले मुख्य ध्येय आहे. पुढील काळात टेमघर गावच्या कोणत्याही विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.”
तर जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले यांनी सरपंच सचिन मरगळे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. ते म्हणाले, “सचिन मरगळे यांनी अत्यंत कमी वयात सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय काम उभे केले आहे. त्यांच्या याच कार्याची पोचपावती म्हणून गावाने त्यांना सलग पाच वर्षे सेवा करण्याची संधी दिली आहे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांचे स्वागत फुलांची उधळण करत आणि पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. या सोहळ्याचे प्रास्ताविक सरपंच सचिन मरगळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मारुती कमलू मरगळे यांनी मानले.
या कार्यक्रमाला संजय उभे, श्रीकांत दारोळे, उज्वला मारणे, पंकज हरपुडे, दिनेश येनपुरे, गणेश मांडेकर, शंकर मरगळे, राजेंद्र दबडे, मारुती मरगळे, तानाजी मारणे, रेणुका मरगळे, दिपाली कोकरे, गौरी भरतवंश, अलका झोरे, सुलोचना ठिकडे, गणेश कोंडेकर, राजेंद्र मारणे, शिवराज शिंदे, प्रफुल मारणे, तानाजी हळंदे, शिवाजी गोरे, भूषण कांबळे, मारुती कोकरे, संगीता मरगळे, विमल मरगळे, दत्तात्रय झोरे यांच्यासह परिसरातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही बातमी कशी वाटली?
टॅग: आदिवासी, टेमघर, दिवाळी, मुठा खोरे, मुळशी, मोसे खोरे, शंकर मांडेकर, शांताराम इंगवले, सचिन मरगळे





प्रतिक्रिया व्यक्त करा