पुणे :- कष्टाचा पैसा, आयुष्याची जमापुंजी आणि डोक्यावर अनेक वर्षांच्या गृहकर्जाचा बोजा… स्वतःच्या हक्काच्या घरात पाऊल ठेवण्याचं स्वप्न उराशी बाळगून एका मध्यमवर्गीय कुटुंबाने पुण्यात फ्लॅट बुक केला. इमारत उभी राहिली, गृहप्रवेशाची तयारी सुरू झाली आणि अचानक एक दिवस दरवाज्यावर महानगरपालिकेची ‘कारवाईची नोटीस’ धडकते किंवा थेट बुलडोझर उभा ठाकतो. रात्रीतून त्या कुटुंबाचे आयुष्यभराचे स्वप्न उद्ध्वस्त होते.
पुण्यात कथित अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आता केवळ कागदोपत्री नियमभंगापुरता किंवा दंडात्मक कारवाईपुरता उरलेला नाही. हा थेट सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक नरसंहाराचा आणि फसवणुकीचा खेळ बनला आहे. या सगळ्या खेळात बिल्डर हात झटकून मोकळा होतो, पण खरा बळी ठरतो तो माहितीपासून वंचित ठेवलेला सामान्य घरखरेदीदार.

वारजे-शिवणे भागात सोशल मीडियावर राजरोस जाहिराती; अभियंत्यांचे हितसंबंध नेमके कोणाशी?
सध्या वारजे माळवाडी, जिजाई गार्डन, तपोधाम सोसायटी, तसेच शिवणे, दांगट पाटील नगर या भागांत सोशल मीडियावरून उघडपणे आणि राजरोसपणे कोट्यवधींच्या घरांच्या जाहिराती सुरू आहेत. २२ लाखांपासून ४६ लाखांपर्यंतचे १ व २ बीएचके ‘लक्झरी’ फ्लॅट, ‘लोन सुविधा’, ‘किचन ट्रॉली मोफत’, ‘वॉटर प्युरिफायर फ्री’ अशा आकर्षक ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.

इंटरनेटवर खुलेआम जाहिरातींचा सुळसुळाट सुरू आहे, बुकिंग सुरू आहे आणि इमारतींची कामेही जोमात चालू आहेत. मग प्रश्न असा पडतो:
-
वारजे आणि शिवणे भागाचे उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंते नेमके काय करत आहेत?
-
लाखो लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून या इमारती पोहोचतात, मग या भागातील क्षेत्रीय अभियंत्यांच्या डोळ्यांवर कोणती पट्टी बांधली गेली आहे?
-
तुमच्याच कार्यक्षेत्रात ही बांधकामे उभी राहून राजरोस फ्लॅटची विक्री सुरू असताना तुम्ही शांत का आहात?
-
तुमचे या बांधकाम विकासकांशी (बिल्डरांशी) नेमके काय वैयक्तिक हितसंबंध आहेत?
नागरिकांच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या या उघड विक्रीकडे दुर्लक्ष करून, इमारत उभी राहिल्यावरच महापालिकेला जाग कशी येते, हा पुणेकरांचा रोखठोक सवाल आहे.
तक्रारदारांची गोपनीय माहिती विकासकाला; अधिकाऱ्यांवर एसीपी आणि कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार!
या संपूर्ण प्रकरणात महापालिकेतील काही अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आणि धक्कादायक असल्याचे उघड होत आहे. अनधिकृत बांधकामांच्या विरोधात पालिकेकडे तक्रार करणाऱ्या सजग नागरिकांची किंवा आरटीआय अर्जदारांची अत्यंत गोपनीय माहिती थेट संबंधित अनधिकृत बांधकाम विकासकाला (बिल्डरला) पुरवली जात असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि गोपनीयतेशी खेळणाऱ्या अशा अधिकाऱ्यांविरोधात सहायक पोलीस आयुक्त (ACP) कोथरूड विभाग तसेच कार्यकारी अभियंता, बांधकाम विकास विभाग क्र. ०३ (पुणे महानगरपालिका) यांच्याकडे रीतसर गंभीर तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. मात्र, अशा गंभीर तक्रारी प्रलंबित असतानाही, संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी उलट माहिती अधिकाराचे (RTI) सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवून माहिती रोखून धरण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे. एका बाजूला विकासकाला आतली गोपनीय माहिती पुरवून हातमिळवणी करायची आणि दुसऱ्या बाजूला सत्य शोधणाऱ्या सामान्य नागरिकाला माहिती नाकारायची, असा दुटप्पी आणि संशयास्पद कारभार सुरू आहे.
पायाभरणी ते पाचवा मजला: महापालिकेची यंत्रणा नेमकी कुठे झोपलेली असते?
शहरातील कोणत्याही भागात अनधिकृत इमारत एका रात्रीत उभी राहत नाही.
-
आधी पाया खणला जातो, सिमेंट-काँक्रीटचे खांब उभे राहतात.
-
एकावर एक मजले चढतात, बाहेर अधिकृत वाटणारे देखणे फलक झळकतात.
-
उघडपणे बुकिंग सुरू होते, शेकडो ग्राहक साईटवर भेटी देतात.
-
बँक कर्ज प्रक्रिया होते आणि प्रत्यक्ष चाव्या हातात देण्याची वेळ येते.
या संपूर्ण प्रक्रियेला वर्ष-दोन वर्षांचा काळ लागतो. मग प्रश्न असा उपस्थित होतो की, हे बांधकाम सुरू असताना क्षेत्रीय कार्यालयाचे संबंधित कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि बांधकाम विकास विभाग काय करत असतात? विटा रचल्या जात असताना न दिसणारे हे बांधकाम घराचा ताबा मिळण्याच्या वेळेसच महापालिकेला कसे दिसते? अनधिकृत काम पहिल्याच टप्प्यात रोखण्याची कायदेशीर जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ती यंत्रणा इमारत पूर्ण होईपर्यंत डोळे झाकून कोणाच्या आशीर्वादाने बसते?
फलक अधिकृततेचा भास देतात; सामान्य माणसाने काय सीआयडी तपास करावा?
एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी आकर्षक फलक आणि सोशल मीडियावर जाहिराती दिसल्या की सामान्य नागरिक ते बांधकाम सर्व नियमांनुसारच सुरू असल्याचे गृहीत धरतो. प्रत्येक ग्राहकाने महापालिकेच्या पायऱ्या झिजवून नकाशा मंजुरी, बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र (CC), भोगवटा पत्र (OC) आणि प्रलंबित नोटिसांचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा करणे कितपत वास्तववादी आहे?
बांधकामाची खरी कायदेशीर स्थिती पारदर्शकपणे जनतेसमोर ठेवणे आणि नागरिकांची दिशाभूल होऊ नये म्हणून अवैध प्रकल्पांवर सुरुवातीलाच लाल झेंडा दाखवणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी नाही का?

आरटीआय विचारला तर उलट तपासणी: ‘तुमचा वैयक्तिक संबंध काय?’
या सगळ्या भ्रष्ट कारभारावर कडी म्हणजे माहितीच्या अधिकाराची होणारी उघड गळचेपी. एखादा सजग नागरिक किंवा घर घेऊ इच्छिणारा ग्राहक जेव्हा माहिती अधिकारात विचारतो—
“हे बांधकाम अधिकृत आहे का?”
“याला किती मजल्यांची मंजुरी आहे आणि महापालिकेने काय कारवाई केली?”
तेव्हा कायद्यानुसार ३० दिवसांत माहिती देण्याऐवजी जनमाहिती अधिकारी उलट प्रश्न विचारतात— “या माहितीशी तुमचा वैयक्तिक हितसंबंध काय?”
नागरिकांच्या या संतप्त प्रश्नाचे उत्तर आता प्रशासनाला द्यावे लागेल:
-
अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी केवळ संबंधित विकासकाच्या मर्जीतील व्यक्तीनेच अर्ज करायचा का?
-
आयुष्याची पुंजी गुंतवण्यापूर्वी प्रकल्पाची सत्यता जाणून घेण्याचा अधिकार सामान्य पुणेकराला नाही का?
-
माहिती दडवून आणि ती थेट विकासकाला पुरवून कोणाचे आर्थिक हितसंबंध जपले जात आहेत?

३० ते ५० लाखांची धूळधाण: जबाबदारी कोणाची?
आज एका सामान्य कुटुंबाने ३०, ४० किंवा ५० लाख रुपये खर्च करून घर घेतले आणि काही महिन्यांतच ‘बांधकाम अनधिकृत’ असल्याचा शिक्का मारून त्यावर हातोडा चालवला, तर त्या कुटुंबाच्या आयुष्यभराच्या नुकसानाची भरपाई कोण करणार?
इमारत पूर्णत्वास जाईपर्यंत दुर्लक्ष करणाऱ्या, सोशल मीडियावर उघड विक्री सुरू असताना डोळेझाक करणाऱ्या, तक्रारदारांची माहिती बिल्डरला पुरवणाऱ्या आणि हफ्तेखोरीच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार का? की नेहमीप्रमाणे बिल्डर पैसे घेऊन मोकळा, महापालिका कारवाईचा दिखावा करण्यात मग्न आणि सर्व शिक्षा फक्त रस्त्यावर आलेल्या निष्पाप ग्राहकालाच मिळणार?
पुणेकरांचा रोखठोक सवाल:
तक्रारी होऊनही जर वारजे-शिवणे भागात इमारती उभ्या राहत असतील, फ्लॅट राजरोस विकले जात असतील, अधिकाऱ्यांवर एसीपी आणि बांधकाम विभागाकडे तक्रारी असतानाही आरटीआयचे नियम डावलून माहिती दडपली जात असेल आणि केवळ शेवटच्या क्षणीच पाडकामाचा दिखावा केला जात असेल, तर ही यंत्रणा अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी काम करतेय की बिल्डरांशी हातमिळवणी करून सामान्य नागरिकांची लूट करण्यासाठी? पुण्यातल्या या संघटित साखळीची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी होणार का, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
#Pune #Warje #Shivne #PMC #RTI #UnauthorizedConstruction #Homebuyers #NirbhidVartmaan


