उद्योगांना गती देण्यासाठी ‘पीएमआरडीए’चा मोठा पुढाकार: उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ‘फॅसिलिटेशन सेंटर’ सुरू होणार
पीएमआरडीएच्या आकुर्डी मुख्यालयातील बैठकीत औद्योगिक संघटनांच्या अडचणींवर चर्चा झाली. उद्योजकांसाठी सुविधा केंद्र, ऑनलाइन बीपीएमएस प्रक्रिया, रस्त्यांची दुरुस्ती आणि औद्योगिक सुरक्षेसाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला.

आकुर्डी, पुणे (निर्भीड वर्तमान प्रतिनिधी):- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि उद्योजकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी पीएमआरडीए प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. उद्योजकांच्या सुलभतेसाठी लवकरच विशेष ‘फॅसिलिटेशन सेंटर’ (सुविधा केंद्र) कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली.

पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच चाकण, हिंजवडी, रांजणगाव, तळेगाव, पिरंगुट यांसह जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतींमधील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रक्रिया होणार १०० टक्के ऑनलाइन व पारदर्शक
औद्योगिक प्रस्तावांना गती देण्यासाठी आणि मानवी हस्तक्षेपाला आळा घालून पारदर्शकता आणण्यासाठी सर्व प्रक्रिया १०० टक्के ‘ऑनलाइन बीपीएमएस’ (BPMS) प्रणालीद्वारेच राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाइन प्रणाली वापरताना उद्योजक आणि वास्तुविशारदांना (Architects) तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी हे नवे ‘फॅसिलिटेशन सेंटर’ मदत कक्ष म्हणून काम करेल. या कक्षात पीएमआरडीएचे तज्ज्ञ अधिकारी आणि बीपीएमएसचे तांत्रिक प्रतिनिधी थेट उपस्थित राहून तात्काळ मार्गदर्शन व मदत पुरवतील.

संघटनांना मिळणार माहितीची थेट उपलब्धता
उद्योगांच्या विविध परवानग्यांसाठी आकारले जाणारे शुल्क, आवश्यक कागदपत्रांची यादी आणि झोनिंग दाखले यांसारखी महत्त्वाची माहिती औद्योगिक संघटनांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे उद्योजकांना मंजुरीच्या प्रक्रियेत होणारा विनाकारण विलंब टळेल.
खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना
चाकण, तळेगाव, पिरंगुट परिसरातील खराब रस्ते आणि गंभीर वाहतूक कोंडीचा थेट फटका औद्योगिक उत्पादनाला आणि कामगारांच्या वाहतुकीला बसत आहे. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी ज्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे, अशा प्राधान्यक्रमाच्या रस्त्यांची यादी संघटनांकडून मागवली असून यावर त्वरित काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

ट्रक टर्मिनस आणि नवीन अग्निशमन केंद्र उभारणार
औद्योगिक पट्ट्यांमध्ये मालवाहू वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी सुसज्ज ‘ट्रक टर्मिनस’ उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच रासायनिक व औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी तातडीने नवीन अग्निशमन केंद्रे (Fire Stations) उभारण्याकरिता जागा निश्चित करण्याचे स्पष्ट निर्देश महानगर आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
या सर्वसमावेशक निर्णयामुळे पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील उद्योग विश्वाला मोठा दिलासा मिळणार असून, कारखानदारीसाठी अधिक पोषक, सुरक्षित आणि गतिमान वातावरण तयार होणार आहे.
ही बातमी कशी वाटली?
टॅग: BPMS, उद्योजक, औद्योगिक विकास, चाकण, तळेगाव, पिरंगुट, पीएमआरडीए, पुणे, फॅसिलिटेशन सेंटर




प्रतिक्रिया व्यक्त करा