पुणे शहर पोलिसांचे धडक ‘ऑल आऊट ऑपरेशन’; २५ अवैध शस्त्रे जप्त, मोक्कासह अनेक फरार व तडीपार आरोपींना बेड्या

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या वतीने २७ ते २८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान विशेष ‘ऑल आऊट ऑपरेशन’ (All Out Operation) राबविण्यात आले. परिमंडळ १ ते ७ आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकांनी राबवलेल्या या धडक मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी, अवैध शस्त्र जप्ती आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून झाडाझडती घेण्यात आली.
शहरात नाकाबंदी, कोम्बिंग आणि हॉटेल तपासणी
मोहिमेदरम्यान पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांत मोठा बंदोबस्त तैनात करून तपासणी मोहीम हाती घेतली होती:
-
कोम्बिंग ऑपरेशन व पायी गस्त: शहरात ६५ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन, तर संवेदनशील व गर्दीच्या ७९ ठिकाणी पायी गस्त (Foot Patrolling) घालण्यात आली.
-
नाकाबंदी व वाहन तपासणी: विविध नाकाबंदीच्या ठिकाणी एकूण १,४६२ वाहनांची कसून तपासणी करण्यात आली असून, मोटार वाहन कायद्यान्वये ७९ कारवाया करण्यात आल्या.
-
हॉटेल व संवेदनशील ठिकाणे: एकूण ३५८ हॉटेल, लॉजेस आणि मुसाफिरखान्यांसह १७२ मर्मस्थळे व संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यात आली.
रेकॉर्डवरील शेकडो गुन्हेगारांची झाडाझडती
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कारागृहातून सुटलेल्या आणि गंभीर गुन्ह्यांतील अभिलेखावरील आरोपींची पोलिसांनी विशेष तपासणी केली:
-
जेल रिलीज आरोपी: कारागृहातून सुटलेल्या ६६० आरोपींची तपासणी करण्यात आली.
-
गंभीर गुन्ह्यांतील आरोपी: खुनाच्या गुन्ह्यातील (कलम ३०२/१०३ बी.एन.एस.) १८३ आरोपी, खुनाच्या प्रयत्नातील (कलम ३०७/१०९ बी.एन.एस.) ३१७ आरोपी आणि मोक्का (MCOCA) गुन्ह्यातील २१३ आरोपींची तपासणी करण्यात आली.
-
शस्त्र कायदा (Arms Act): कलम ३(२५) मधील १२९ आणि कलम ४(२५) मधील ३१२ आरोपींची तपासणी करण्यात आली (यामध्ये बी.एन.एस. ३१० व इतर कलमान्वये ४ कारवाया करण्यात आल्या).
-
इतर गुन्हेगार: एन.डी.पी.एस. (NDPS) गुन्ह्यातील अभिलेखावरील तपासणीत ७० आरोपी मिळून आले. पोक्सो (POCSO) गुन्ह्यातील १०६ पैकी ४३ आरोपी, तर जबरी चोरी (चेन व मोबाईल स्नॅचिंग) मधील १०६ पैकी ४४ आरोपी तपासणीत मिळून आले.
अवैध शस्त्र जप्ती, अटक आणि प्रतिबंधात्मक कारवाया
या विशेष मोहिमेतून पोलिसांनी अनेक फरार आणि अवैध धंदे करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या:
-
फरार व तडीपार आरोपींना अटक: पाहिजे असलेल्या (Wanted) २ आरोपींसह मोक्का गुन्ह्यातील १ अशा एकूण ३ पाहिजे आरोपींना अटक करण्यात आली. तसेच तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ८ तडीपार आरोपींना अटक करण्यात आली असून, ४ अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले.
-
अवैध शस्त्रांवर कारवाई: अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकूण २३ गुन्हे दाखल करून १६ आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून २५ अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली. याशिवाय शस्त्र विक्री करणाऱ्या २२ आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
-
अंमली पदार्थ व अवैध धंदे: अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी (NDPS) ७ गुन्हे दाखल करून ८ आरोपींना अटक करण्यात आली. दारूबंदी व जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये ६ कारवाया करत अवैध धंद्यावर छापा टाकून १ आरोपीस अटक करण्यात आली.
-
प्रतिबंधात्मक कारवाई: महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये ८ कारवाया, कलम १२२ अन्वये १ कारवाई, अनधिकृत फेरीवाल्यांवर ६ कारवाया आणि इतर २८ कारवाया करण्यात आल्या.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
पुणे शहर पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारांवर मोठा वचक निर्माण झाला आहे. नागरिकांना परिसरात कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा व्यक्ती आढळल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी किंवा नियंत्रण कक्षाच्या ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ही बातमी कशी वाटली?
टॅग: #PunePolice #AllOutOperation #PuneNews #CrimeNews #पुणेपोलीस #पुणेबातम्या #निर्भीडवर्तमान





प्रतिक्रिया व्यक्त करा