गणेशोत्सवाच्या गर्दीत सायबर सुरक्षेचा धडा: चिंचवडमध्ये ‘लोकसंवाद-२०२६’ मधून नागरिकांना सायबर फसवणुकीविरुद्ध मोलाचे आवाहन!
पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमातून नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.

पुणे प्रतिनिधी:- चिंचवड परिसरातील गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात बाप्पाच्या दर्शनासाठी जमणाऱ्या नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सायबर पोलीस ठाणे आणि जिल्हा माहिती कार्यालयाकडून ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षेबाबत विशेष जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. २४ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानांतर्गत चिंचवड गाव भाजी Market येथील नवतरुण मंडळ आणि गांधी पेठ तालीम मित्र मंडळ येथे सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी स्नेहल संजय तिताडे, नारायणी विजय पाटील आणि संगिता संजय पुरी यांनी उपस्थितांशी थेट संवाद साधत सुरक्षिततेचा संदेश दिला.
संवादादरम्यान अधिकाऱ्यांनी नागरिकांना सायबर गुन्हेगारांच्या विविध क्लृप्त्यांबद्दल सतर्क केले. हल्ली गुन्हेगार लॉटरी, पार्ट-टाईम जॉब किंवा त्वरित आर्थिक लाभाची आमिषे दाखवून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे अनोळखी कॉल्स, मेसेज, संशयास्पद लिंक्स, बनावट संकेतस्थळे आणि अनधिकृत ॲप्स डाऊनलोड करण्यापासून प्रत्येकाने दूर राहिले पाहिजे. याशिवाय कोणतीही वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती कोणाशीही शेअर करू नये आणि सोशल मीडिया खात्यांवर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनसारख्या सुरक्षा सुविधा सुरू ठेवाव्यात, असा महत्त्वाचा सल्लाही पोलिसांनी दिला.

गणेशोत्सवाच्या गर्दीचा आणि ‘लोकसंवाद’च्या व्यासपीठाचा सकारात्मक उपयोग करून सायबर सुरक्षेचा हा संदेश थेट लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे. दुर्दैवाने असा प्रकार घडून सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी अजिबात न घाबरता तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनातर्फे शेवटी करण्यात आले.




प्रतिक्रिया व्यक्त करा