पुण्यात हायप्रोफाईल रॅकेटचा पर्दाफाश: ‘कॉल करा आणि बुकिंग मिळवा…!’ गुन्हेगारीच्या मागे दडलेले अनैतिक जाळे पोलिसांकडून उद्ध्वस्त
पुण्यात हायप्रोफाईल रॅकेटचा पर्दाफाश: 'कॉल करा आणि बुकिंग मिळवा...!' गुन्हेगारीच्या मागे दडलेले अनैतिक जाळे पोलिसांकडून उद्ध्वस्त पुण्यातील कल्याणी नगर आणि येरवडा परिसर दिवसभर नेहमीच्या गजबजाटात असतो, मात्र याच भागातील काही लॉजेसवर रात्रीच्या अंधारात एक वेगळाच छुपा उद्योग सुरू असल्याची माहिती समोर येत होती. ग्राहकांकडू…

पुणे प्रतिनिधी:- पुण्यातील कल्याणी नगर आणि येरवडा परिसर दिवसभर नेहमीच्या गजबजाटात असतो, मात्र याच भागातील काही लॉजेसवर रात्रीच्या अंधारात एक वेगळाच छुपा उद्योग सुरू असल्याची माहिती समोर येत होती. ग्राहकांकडून फोनवर बुकिंग घेणे, विशिष्ट रक्कम ठरवणे आणि येरवडा व कल्याणी नगर परिसरातील लॉजेसवर महिलांना अनैतिक व्यापारासाठी पाठवणे असे जाळे यामागे कार्यरत होते. मात्र, हा रॅकेट चालवणाऱ्यांच्या प्रत्येक हालचालीवर येरवडा पोलिसांची करडी नजर होती.
येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार रामेश्वर नवले यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, येरवड्यातील एका हॉटेलमधून काही इसम फोनवर बुकिंग करून ग्राहकांना मुली पुरवण्याचे काम करत आहेत. बातमी मिळताच त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांना याबद्दल माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांनी क्षणाचाही विलंब न करता पथकाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीची पूर्ण खात्री पटवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ रणनीती आखली. एका पोलिसाला बनावट ग्राहक (Dummy Customer) बनवून त्या हॉटेलमध्ये पाठवण्यात आले, तर इतर पथकाने हॉटेलच्या सभोवतालच्या परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली. बनावट ग्राहकाने संपर्क साधून व्यवहार निश्चित करताच पोलिसांना इशारा मिळाला आणि पोलिसांनी क्षणाचाही वेळ न घालवता हॉटेलवर अचानक छापा टाकला. या धाडीदरम्यान पोलिसांनी अनैतिक व्यापारास प्रवृत्त केलेल्या २ पीडित महिलांची सुरक्षित सुटका केली.
छाप्यानंतर सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलांकडे पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेने सखोल चौकशी केली असता, त्यांनी हा व्यवसाय चालवणाऱ्या मुख्य सूत्रधारांची माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी किशोर बेरड, पोलीस अंमलदार वाबळे, गणेश पालवे आणि सोमनाथ गायकवाड यांनी तात्काळ अप्पर खराडी रोड परिसरात धाव घेऊन सापळा रचला. पोलिसांनी शिताफीने पाठलाग करत खराडी येथील राज राजेशाम सविता (वय २८) आणि काळेपडळ, हडपसर येथील सुनील शिवाजी शिंदे (वय ३७) या दोन आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १४३(३), ३(५) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम (PITA) कलम ४ नुसार गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही धडक कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ०४) चिलुमूला रजनीकांत, साहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) सुनील जैतापूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते, पोनि (गुन्हे) शारदा कोकाटे व पोनि (गुन्हे) केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शरद देठे, पो.उ.नि. किशोर बेरड, पोलीस अंमलदार रामेश्वर नवले, कोकणे, शैलेश वाबळे, गणेश पालवे, सोमनाथ गायकवाड, सागर दळवी, लक्ष्मण ठोकळ, नितीन चांदणे, नागेश कुंजटवाड, प्रशांत कांबळे, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार, संदीप धादवड आणि महिला पोलीस अंमलदार ज्योती नाईक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




1 प्रतिक्रिया