पुणेकरांचे लक्ष असू द्या! चांदणी चौकातून कोथरूडकडे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर
एसटी, खाजगी ट्रॅव्हल्स आणि जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग; वृंदावन कॉम्प्लेक्सजवळ नो पार्किंग, ९ नोव्हेंबरपर्यंत हरकतींची मुदत.

पुणे:- शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी चांदणी चौकात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. कोथरूड वाहतूक विभागांतर्गत चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने जाणाऱ्या जड वाहनांना, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसना तसेच खाजगी ट्रॅव्हल्स बसेसना तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिले आहेत.

चांदणी चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. त्यातच कोथरूडकडे जाणाऱ्या मोठ्या बसेस आणि जड वाहनांमुळे कोंडीची समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी प्रशासनाने सदर मार्गावर निर्बंध आणले असून पर्यायी वाहतूक मार्ग निश्चित केला आहे.
असा असेल पर्यायी मार्ग:
चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसेस, खाजगी ट्रॅव्हल्स बसेस आणि जड वाहनांना आता थेट प्रवेश मिळणार नाही. या वाहनांना खालील मार्गाने इच्छित स्थळी जावे लागेल:

चांदणी चौक → डुक्कर खिंड → वारजे जंक्शन → आंबेडकर चौक → वनदेवी चौक → पुणेकर रोड मार्गे पौडफाटा.
‘वृंदावन कॉम्प्लेक्स’जवळ नो पार्किंग झोन
वाहतूक कोंडी रोखण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून वृंदावन हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या गेट नंबर दोनच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी १० मीटर अंतराचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. येथे वाहन थांबवल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांना हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन
या वाहतूक बदलांसंदर्भात आणि नो पार्किंग झोनबाबत स्थानिक नागरिक, प्रवासी किंवा वाहनचालकांना काही सूचना अथवा हरकती नोंदवायच्या असल्यास त्यांनी ९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात.
सूचना पाठवण्याचा पत्ता:
पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला नंबर ६, एअरपोर्ट रोड, पुणे.
नागरिकांनी या नवीन नियमांची नोंद घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे.
ही बातमी कशी वाटली?
टॅग: एसटी बस, कोथरूड, चांदणी चौक, नो पार्किंग, पुणे, वाहतूक बदल





प्रतिक्रिया व्यक्त करा