पुणे: अग्निशस्त्राचा वापर करून जीवघेणा हल्ला केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. आंबेगाव परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
पुणे शहर पोलिसांच्या प्रेसनोटनुसार, आंबेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व शस्त्रासंबंधी कलमांखाली गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अतिष उमेश मोरे (वय २९, रा. सिंहगड रोड, पुणे) हा गुन्हा दाखल झाल्यापासून अस्तित्व लपवून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता.
दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-२ चे पथक शहरातील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी आणि महेश मंडलिक यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी आंबेगाव दरी पुलाजवळील परिसरात असल्याची माहिती मिळाली.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या निदर्शनास आणून कायदेशीर कारवाईचे आदेश घेतल्यानंतर युनिट-२ च्या अधिकारी व अंमलदारांनी दरी पूल परिसरात सापळा रचला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात अटक केली.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास आंबेगाव पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
#PunePolice #CrimeBranch #Ambegaon #PuneCrime #NirbhidVartmaan


