सौर कृषिपंप उभारणीत महाराष्ट्र देशात अव्वल; देशातील एकूण पंपांपैकी ६५ टक्के पंप राज्यात कार्यरत

मुंबई: शेतकऱ्यांना सिंचनासाठी सक्षम आणि पर्यावरणपूरक ऊर्जा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्राने देशात मोठी आघाडी घेतली आहे. देशभरात बसवण्यात आलेल्या एकूण सौर कृषिपंपांपैकी तब्बल ६५ टक्के पंप एकट्या महाराष्ट्रात बसवण्यात आले आहेत. या विक्रमी कामगिरीमुळे अपारंपरिक ऊर्जेच्या वापरात राज्य देशात मार्गदर्शक ठरले असून, राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
८० टक्के कृषिपंपांना आता दिवसा वीज
शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागू नये आणि वन्य प्राण्यांच्या धोक्यापासून संरक्षण व्हावे, यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या वेगवान कामांमुळे राज्यातील सुमारे ८० टक्के कृषिपंपांना सध्या दिवसा वीजपुरवठा करणे शक्य झाले आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


मार्चअखेर १०० टक्के पंपांना सौरऊर्जेचे उद्दिष्ट
महावितरणने या अभियानाला गती दिली असून, पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत राज्यातील १०० टक्के कृषिपंपांना सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी, उपकेंद्रांचे सक्षमीकरण आणि कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण वेगाने पूर्ण केले जात आहे.
शेतकऱ्यांचे जीवन सुकर, कार्बन उत्सर्जनात घट
सौर कृषिपंपांच्या व्यापक विस्तारामुळे पारंपारिक विजेवरील भार मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे. शेतकऱ्यांना हक्काची, विनाखंड आणि दिवसा वीज मिळत असल्याने शेती उत्पादकतेत वाढ होण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर औष्णिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी झाल्याने कार्बन उत्सर्जनात मोठी घट होत असून, हे पाऊल पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.
ही बातमी कशी वाटली?
टॅग: महाराष्ट्र, महावितरण, सौर कृषिपंप, सौरऊर्जा





प्रतिक्रिया व्यक्त करा