हिंगणीगाडा येथील ‘महादेव मळा’ पाझर तलावाला स्टोन क्रशरचा धोका; खोदकाम तात्काळ थांबवण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
हिंगणीगाड्यातील पाझर तलावाच्या सुरक्षिततेचा प्रश्न; जिल्हा प्रशासन व महसूल विभागाकडे प्रत्यक्ष पाहणी आणि तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी.

पुणे / दौंड :- दौंड तालुक्यातील मौजे हिंगणीगाडा येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ‘महादेव मळा पाझर तलावा’लगत एका खाजगी कंपनीच्या स्टोन क्रशरसाठी सुरू असलेले खोदकाम तात्काळ थांबवावे, अशी जोरदार मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. या खोदकामामुळे तलावाच्या अस्तित्वाला आणि परिसरातील बागायती शेतीला मोठा धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट करत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे आणि महसूल विभागाला या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
मौजे हिंगणीगाडा येथील गट क्रमांक ३७९ मध्ये जिल्हा परिषदेचा ‘महादेव मळा पाझर तलाव’ आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता सुमारे १४४.४३ स.घ.मी. असून, परिसरातील सुमारे ३० हेक्टर शेतीचे सिंचन या पाण्यावर अवलंबून आहे. शेतीसोबतच स्थानिक वन्यजीव आणि पशुधनासाठी हा तलाव पाण्याचा मुख्य स्रोत आहे.
सध्या एका खाजगी कंपनीच्या स्टोन क्रशर प्रकल्पासाठी या तलावाच्या पूर रेषेपासून अवघ्या २७५ मीटर अंतरावर आणि मुख्य भरावापासून केवळ ४५० मीटर अंतरावर खोदकाम सुरू करण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराबाबत जिल्हा परिषद (लघुपाटबंधारे) उपविभाग, बारामती यांनी दौंडच्या तहसीलदारांना अधिकृत पत्र देऊन धोक्याची पूर्वकल्पना दिली आहे.
ब्लास्टिंगमुळे तलावाला तडे जाण्याची भीती
स्टोन क्रशरच्या कामासाठी भविष्यात मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग (स्फोट) केले जाण्याची शक्यता आहे. अशा स्फोटांमुळे आणि सततच्या हादऱ्यांमुळे पाझर तलावाच्या मातीच्या भरावाला तडे जाण्याचा किंवा भराव खचण्याचा थेट धोका निर्माण झाला आहे. तसेच क्रशरच्या धूळ आणि रासायनिक प्रक्रियांमुळे तलावातील पाणी दूषित होण्याची दाट शक्यता आहे. तलावाच्या खालील भागात विस्तीर्ण बागायती शेती असल्याने, तलावाला काही इजा झाल्यास शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊ शकते.
खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा
या संपूर्ण प्रकारावर भाष्य करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,
> “हा प्रश्न केवळ एका तलावाचा नसून स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ, वन्यजीव आणि पर्यावरणाच्या अस्तित्वाशी निगडित आहे. पर्यावरण, शेती आणि मुक्या जनावरांचे नुकसान करून कोणत्याही अनधिकृत किंवा नियमबाह्य कामांना परवानगी दिली जाऊ नये. पुणे जिल्हा प्रशासन व महसूल विभागाने या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन जागेवर प्रत्यक्ष पाहणी करावी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी हे खोदकाम तात्काळ थांबवावे.”
प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हितासाठी तीव्र भूमिका घेतली जाईल, असा सूर आता हिंगणीगाडा परिसरात उमटत आहे.
ही बातमी कशी वाटली?
टॅग: दौंड, पर्यावरण, पाझर तलाव, पुणे, सुप्रिया सुळे, स्टोन क्रशर, हिंगणीगाडा





प्रतिक्रिया व्यक्त करा