पीएमआरडीएचा डिजिटल कारभाराकडे नवा टप्पा: क्षेत्रीय पाहणी गतिमान करण्यासाठी ‘PMRDA Q-Pad’ ॲपचे प्रशिक्षण
PMRDA Q-Pad ॲपच्या वापरासाठी आकुर्डी मुख्यालयात प्रशिक्षण कार्यशाळा. क्षेत्रीय पाहणी, भूखंड पडताळणी आणि GIS पोर्टलवर तत्काळ माहिती नोंदविण्याबाबत मार्गदर्शन.

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून क्षेत्रीय कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘PMRDA Q-Pad’ हे विशेष सर्वे ॲप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आले आहे. या ॲपच्या प्रभावी वापरासंदर्भात आकुर्डी येथील प्राधिकरणाच्या मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एका विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कामकाजात अचूकता आणि गती येणार
या आधुनिक प्रणालीमुळे क्षेत्रीय पाहणी (Field Survey), प्रत्यक्ष स्थळ व भूखंड पडताळणी, विविध विकासकामांचा आढावा, अनधिकृत बांधकामांची तत्काळ जागेवरच नोंद तसेच अग्निशमनविषयक प्रत्यक्ष तपासणीची कामे अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने करणे शक्य होणार आहे. क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याद्वारे कामाचा प्रत्यक्ष अहवाल तत्काळ नोंदवता येईल.

जीआयएस (GIS) पोर्टलशी थेट जोडणी
‘Q-Pad’ या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे प्रत्यक्ष जागेवर जाऊन संकलित केलेली सर्व माहिती थेट प्राधिकरणाच्या ‘भौगोलिक माहिती प्रणाली’ (GIS) पोर्टलवर अद्ययावत (Real-time update) केली जाईल. यामुळे पुणे महानगर प्रदेशातील संपूर्ण भौगोलिक आणि नियोजनाचा डेटा एकाच व्यासपीठावर उपलब्ध होईल. परिणामी, प्रदेशाचा शाश्वत व सुनियोजित विकास आखणे प्रशासनाला अधिक सोपे जाणार आहे.

प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन
या कार्यशाळेत सहभागी कर्मचाऱ्यांना ॲपच्या वापराबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये:
- ॲपमधील सुरक्षित लॉगिन प्रक्रिया,
- विभागांनुसार कर्मचाऱ्यांना दिलेले अधिकार व जबाबदाऱ्या,
- नकाशावर प्रत्यक्ष जागेचे अचूक स्थान (Location/Geo-tagging) निश्चित करणे,
- विविध अर्जांचे डिजिटल स्वरूप व त्यांची प्रत्यक्ष हाताळणी या सर्व घटकांचे थेट प्रात्यक्षिक (Demo) दाखवून कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
विविध विभागांची उपस्थिती: या प्रशिक्षण कार्यशाळेस अधीक्षक भूमी अभिलेख तथा भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) कक्षप्रमुख आशा जाधव, वृक्ष अधिकारी सचिन रघतवान यांच्यासह विकास परवानगी व नियोजन, अनधिकृत बांधकाम निर्मूलन, अभियांत्रिकी, भूमी व मालमत्ता, अग्निशमन आणि माहिती व तंत्रज्ञान (IT) विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी कशी वाटली?
टॅग: GIS, PMRDA Q-Pad, आकुर्डी, क्षेत्रीय पाहणी, डिजिटल प्रशासन, पीएमआरडीए, पुणे, प्रशिक्षण कार्यशाळा





प्रतिक्रिया व्यक्त करा