पुणे:- जिल्ह्यातील वाढती सुरक्षा आव्हाने आणि नागरिकांमधील भीतीचे वातावरण लक्षात घेता पुणे ग्रामीण पोलीस हद्दीत ड्रोन व तत्सम हवेत उडणाऱ्या वस्तूंच्या वापरावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोणत्याही खाजगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या किंवा व्यावसायिक छायाचित्रकारांना ड्रोन कॅमेरा वापरण्यापूर्वी किमान ७ दिवस आधी स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती देऊन संबंधित प्रभारी अधिकाऱ्याची रितसर परवानगी घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
याबाबतचे अधिकृत प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय
पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये महत्त्वाची धार्मिक स्थळे, प्रमुख धरणे आणि अनेक संवेदनशील केंद्रीय संस्था आहेत. अशा ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून, दहशतवादी किंवा समाजकंटक ड्रोनचा वापर करून टेहळणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच, गेल्या काही दिवसांपासून दौंड, बारामती आणि शिरूर तालुक्यांच्या परिसरात रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून ड्रोन उडवले जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय, वाळू माफियांकडून पोलिसांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आणि इतर चोरट्यांकडून टेहळणीसाठी ड्रोनचा गैरवापर केला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे.
या उपकरणांवर बंदी आणि अटी
अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, पूर्वपरवानगीशिवाय खालील उपकरणांच्या वापरावर पूर्णपणे बंदी असेल:
ड्रोन आणि रिमोट-नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट
पॅराग्लायडर आणि पॅरा मोटर्स
हँग ग्लायडर आणि हॉट एअर बलून
हवेत उडणाऱ्या तत्सम सर्व वस्तू
छायाचित्रण किंवा कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी ड्रोन वापरायचा असल्यास, ७ दिवस आधी पोलीस ठाण्यात अर्ज करून प्रभारी पोलीस अधिकाऱ्याची लिखित परवानगी घेणे आवश्यक राहील.
आदेश न मानल्यास कडक कारवाई
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या आदेशाचे उल्लंघन करून पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही व्यक्ती ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करताना आढळल्यास, तिच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २३३ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांना सहकार्य करावे आणि आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद ड्रोन हालचाल आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


