पेण (रायगड):- “भ्रष्टाचार हा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. सामान्य जनतेच्या रक्ताघामाच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या लुटारू टोळीवर अंकुश लावणे गरजेचे आहे. त्यासाठी आवाज उठवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे,” अशा शब्दांत ॲड. आनंद राजहंस यांनी पेणमधील राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मोठ्या गैरव्यवहारांविरोधात रणशिंग फुकले आहे. पेणमधील एका बड्या शासकीय कंत्राटदाराकडील बेनामी संपत्ती, बेकायदेशीर डांबर प्लांट आणि राजकीय नेत्यांच्या काळ्या पैशाच्या गैरव्यवहाराबाबत (Money Laundering) त्यांनी थेट प्रशासनाकडे अधिकृत तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रारीमुळे पेणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील राजकीय आणि उद्योग जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे.

बड्या नेत्यांचा ‘फ्रंटमॅन’ आणि मनी लाँड्रिंगचा संशय
ॲड. आनंद राजहंस यांनी केलेल्या तक्रारीनुसार, संबंधित शासकीय कंत्राटदार हा पेणमधील काही अत्यंत वजनदार आणि प्रभावशाली राजकीय नेत्यांचा “फ्रंटमॅन” (Frontman) म्हणून काम करत आहे. या नेत्यांचा कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा (Black Money) या कंत्राटदाराच्या आणि संबंधित उद्योगपतींच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये वळवला जात आहे. कंत्राट आणि विविध उद्योगांच्या नावाखाली या काळ्या पैशाची बेकायदेशीरपणे फिरवाफिरवी (Money Laundering) केली जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
शासकीय जागेवर अनधिकृत डांबर प्लांट?
पेण तालुक्यातील पूर्व भागातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भागात कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता, पूर्णपणे अनधिकृतपणे एक अवाढव्य ‘डांबर प्लांट’ उभारण्यात आला आहे.
* या डांबर प्लांटमधून दरमहा कोट्यवधी रुपयांची अवैध उलाढाल होत आहे.
* ज्या जागेवर हा प्लांट सुरू आहे, ती जागा शासकीय आरक्षित असण्याची दाट शक्यता आणि संशय व्यक्त केला जात आहे.
* या परिसरात कंत्राटदाराच्या छुप्या पाठिंब्याने मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले असून, सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे.
१० ते १२ वर्षांत संपत्तीचा डोंगर कसा उभा राहिला?
गेल्या १० ते १२ वर्षांच्या कालावधीत या कंत्राटदाराची आर्थिक झेप संशयास्पद ठरत आहे. पेण आणि परिसरात अनेक सीएनजी (CNG) गॅस पंप, मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेल्या जमिनी, शासकीय कंत्राटे घेणारी मोठी बांधकाम कंपनी आणि वेगवेगळ्या उद्योगांमध्ये असलेली अप्रत्यक्ष भागीदारी, या सगळ्यामागे नेमका कोणता पैसा आहे, असा सवाल आता पेणमधील सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील आपल्या वावराचा गैरवापर करून केवळ स्वतःची बेनामी संपत्ती वाढवण्याचे काम सुरू असल्याचा दाट संशय ॲड. राजहंस यांनी व्यक्त केला आहे.
निसर्गाचे नुकसान आणि जनतेची लूट खपवून घेणार नाही!
या कंत्राटदाराच्या आणि नेत्यांच्या दहशतीमुळे आजवर कोणीही तक्रार करण्याची हिंमत दाखवली नव्हती. मात्र, बेकायदेशीर डांबर प्लांटमुळे होणारे निसर्गाचे आणि पर्यावरणाचे अतोनात नुकसान आता सहन केले जाणार नाही, अशी भूमिका ॲड. राजहंस यांनी घेतली आहे.
“जनतेच्या पैशांची लूट आणि निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या या टोळीविरोधात मी सातत्याने आवाज उठवणारच,” असा निर्धार ॲड. आनंद राजहंस यांनी व्यक्त केला आहे. आता या प्रकरणावर प्रशासन काय कारवाई करते, याकडे संपूर्ण पेण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


