मुख्य मजकुराकडे जा
, १५ ऑक्टोबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
निवनिर्भीडवर्तमान

निडर लेखणी, निष्पक्ष बातमी..!

ब्रेकिंग
महाराष्ट्र

दिवाळीत सर्वसामान्यांना मोठा दिलासा: एसटीची १५ टक्के हंगामी भाडेवाढ परिवहन मंत्र्यांनी फेटाळली

दिवाळीत एसटी महामंडळाची प्रस्तावित १५ टक्के हंगामी भाडेवाढ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नामंजूर केली.

✍
2 मिनिटे वाचन

मुंबई: ऐन दिवाळीच्या सणात लालपरीने गावी जाणाऱ्या लाखो चाकरमानी आणि सर्वसामान्य प्रवाशांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात एसटी प्रशासनाने प्रस्तावित केलेली १५ टक्के हंगामी भाडेवाढ परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पूर्णपणे नामंजूर केली आहे. आधीच महागाई आणि दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जनतेवर आर्थिक भार टाकणे योग्य नाही, अशी ठाम भूमिका घेत मंत्र्यांनी हा जनहितैषी निर्णय घेतला.

१ ते १५ नोव्हेंबरदरम्यान प्रस्तावित होती वाढ

एसटी महामंडळाच्या नियमानुसार सणासुदीच्या आणि सुट्ट्यांच्या गर्दीच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी तात्पुरती भाडेवाढ करण्याची तरतूद आहे.

त्यानुसार एसटी प्रशासनाने यंदा १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रवासी भाड्यात सरसकट १५ टक्के वाढ करण्याचा अधिकृत प्रस्ताव परिवहन मंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवला होता. जर हा प्रस्ताव मंजूर झाला असता, तर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागले असते.

‘जनतेच्या खिशावर भार नको’ — सरकारची भूमिका

सध्या राज्यातील शेतकरी दुष्काळ, अवकाळी आणि शेतीमालाच्या अस्थिर भावामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे.

दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबांची महिन्याचा ताळेबंद सांभाळताना दमछाक होत आहे. अशा नाजूक परिस्थितीत जनतेवर भाडेवाढीचा अतिरिक्त बोजा कशासाठी लादायचा, असा सवाल उपस्थित करत मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाचा प्रस्ताव थेट फेटाळला.

“एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असले तरी त्यावर मात करण्यासाठी इतर पर्यायी मार्ग शोधले जातील. मात्र, आर्थिक संकटात असलेल्या बळीराजाला आणि सामान्य प्रवाशाला दिलासा देणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे,” अशी स्पष्ट ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वेचे आरक्षण महिनाभर आधीच फुल्ल झालेले असते, तर खासगी ट्रॅव्हल्सचालक मनमानी भाडेवाढ करून प्रवाशांची लूट करतात.

अशा वेळी सर्वसामान्यांसाठी एसटी हीच एकमेव हक्काची आणि परवडणारी जीवनवाहिनी ठरते. ऐन सणाच्या तोंडावर भाडेवाढ रद्द झाल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी, कष्टकरी आणि शहरी चाकरमान्यांनी या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , , , , , ,

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.