सेवा संकल्प अभियानातून दिलासा: सांगलीत १५९ बालकांची नेत्रतपासणी, ६६ जणांवर होणार मोफत शस्त्रक्रिया
सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत १५९ बालकांची नेत्रतपासणी करण्यात आली. ६६ बालकांना मोफत शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले.

सांगली (निर्भीड वर्तमान प्रतिनिधी): ग्रामीण आणि दुर्गम भागातील बालकांमधील नेत्रदोषांचे वेळेत निदान व्हावे या उद्देशाने, सेवा संकल्प अभियानांतर्गत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि डी.ई.आय.सी.च्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात जिल्ह्यातील १५९ गरजू बालकांची सखोल तपासणी करण्यात आली असून, त्यातील ६६ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन, डॉ. माधवी पटवर्धन आणि आभाळमाया फाउंडेशनचे नारायण उंटवाले उपस्थित होते.
शाळा आणि अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांचा शोध
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जतपासून शिराळ्यापर्यंतच्या सर्व तालुक्यांसह सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली होती.
यामध्ये नेत्रदोष आढळलेल्या बालकांना या विशेष शिबिरासाठी संदर्भित करण्यात आले होते.
अद्ययावत उपकरणांद्वारे तपासणी आणि मोफत उपचार
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करारबद्ध असलेल्या नंदादीप नेत्रालयाच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने सर्व बालकांची सूक्ष्म तपासणी केली. तपासणीअंती ६६ बालकांना शस्त्रक्रियेची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट झाले.
यातील ४३ बालकांच्या शस्त्रक्रिया शासकीय योजनांच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत केल्या जातील, तर उर्वरित २३ शस्त्रक्रियांसाठी आवश्यक असणारा खर्च स्वतंत्र निधी व मदतीच्या माध्यमातून उभा केला जाणार आहे. त्यामुळे एकाही बालकावर उपचाराविना राहण्याची वेळ येणार नाही.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस, रोहित चौगुले यांच्यासह डी.ई.आय.सी. व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्रशासनाच्या या संवेदनशील पुढाकारामुळे अनेक चिमुकल्यांचे जीवन दृष्टिदोषमुक्त होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
ही बातमी कशी वाटली?
टॅग: डीईआयसी, नंदादीप नेत्रालय, नेत्रतपासणी, बाल आरोग्य, मोफत शस्त्रक्रिया, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, सांगली, सिव्हिल हॉस्पिटल सांगली, सेवा संकल्प अभियान




प्रतिक्रिया व्यक्त करा