मुख्य मजकुराकडे जा
, १३ सप्टेंबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
निवनिर्भीडवर्तमान

निडर लेखणी, निष्पक्ष बातमी..!

ब्रेकिंग
महाराष्ट्र

१८ जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती; नुकसानीचे अहवाल तात्काळ द्या—बावनकुळेंचे आदेश

१८ जिल्ह्यांतील दुष्काळसदृश परिस्थितीचा बावनकुळेंनी आढावा घेतला. पिकांच्या नुकसानीचे अहवाल तात्काळ मागवले; मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर उपाययोजना.

2 मिनिटे वाचन

निर्भीड वर्तमान वृत्तसेवा

नागपूर : राज्यातील १८ जिल्ह्यांमधील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पिकांच्या नुकसानीसह जिल्ह्यातील परिस्थितीचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन तातडीच्या उपाययोजना करता याव्यात, यासाठी हे अहवाल मागवण्यात आले आहेत.

नागपूर येथून दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत बावनकुळे यांनी संबंधित जिल्ह्यांचा आढावा घेतला. प्राप्त अहवालांच्या आधारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून प्रभावी उपाययोजना राबवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पिकांचे झालेले नुकसान आणि उद्भवलेल्या परिस्थितीची संपूर्ण माहिती अहवालात देण्याच्या सूचना महसूल मंत्र्यांनी दिल्या. जिल्हानिहाय माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्याच्या आधारे मंत्रिमंडळात विषय मांडून निर्णय घेता यावा, हा या आढाव्याचा उद्देश आहे.

कोणत्या १८ जिल्ह्यांचा समावेश?

अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर उपाययोजनांची दिशा

संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार आहे. त्या चर्चेच्या आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या आधारे पुढील उपाययोजना राबवण्यात येतील, असे बावनकुळे यांनी बैठकीत सांगितले.

बैठकीला खासदार माया इवनाते, आमदार प्रवीण दटके, मोहन मते, समीर मेघे, चरणसिंग ठाकूर, डॉ. राजीव पोतदार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त विपीन इटनकर, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

ही बातमी कशी वाटली?

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.