पुणे प्रतिनिधी:- विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरच्या अवैध ऑनलाइन विक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी सापळा रचून या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून १ लाख ४२ हजार ६९० रुपये किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त केला आहे.
विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऑनलाइन बेकायदेशीरपणे ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस अंमलदार हरीप्रसाद पुंडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ३० जून २०२६ रोजी एका बनावट ग्राहकामार्फत ऑनलाइन हुक्का फ्लेवरची ऑर्डर दिली. त्यानंतर सीसीडी चौक, कोनार्कनगर सोसायटीजवळ सापळा लावून पोर्टरद्वारे डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पार्सलमध्ये १८ हजार ३२० रुपये किमतीचे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर मिळून आले.
डिलिव्हरी बॉयकडे चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मोहम्मदवाडी येथील ‘शिषा कॉर्नर’ या दुकानावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी खालील दोन असद चांदमिया बरभैया (वय ३१, रा. बागदीनगर, कोंढवा, पुणे व विकास रमेश बागल (वय ३३, रा. मोहम्मदवाडी, पुणे या आरोपींना ताब्यात घेतले यांच्या दुकानाची झडती घेतली असता, तेथे १ लाख २४ हजार ३७० रुपये किमतीचे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर, ई-सिगारेट आणि संबंधित साहित्य सापडले. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण १ लाख ४२ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक व जाहिरात प्रतिबंध अधिनियम २०१९’ च्या कलम ७ व ८ आणि ‘सिगारेट व तंबाखूजन्य इतर उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम २००३’ च्या कलम ७(२) व २०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


