पुणे प्रतिनिधी:- विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका वृद्ध महिलेच्या घरातील ७ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे वृद्ध महिलेचे चोरीला गेलेले दागिने परत मिळवण्यास पोलिसांना यश आले आहे.
दिनांक १६ जून २०२६ रोजी एका फिर्यादीने आपल्या वृद्ध आईचे घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याबाबत विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड यांच्यावर सोपवला होता. तपासादरम्यान पोलिसांनी फिर्यादीच्या घरी काम करणाऱ्या अनिता रामचंद्र सुतार (वय ४५ वर्षे, रा. मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) या महिलेला ताब्यात घेतले. पोलिसांच्या कौशल्यपूर्ण चौकशीत अनिता सुतार हिने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
आरोपीकडून पोलिसांनी ७ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, चांदीचे ग्लास आणि निरंजन असा मुद्देमाल पुणे आणि सोलापूर येथून हस्तगत केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक कांतीलाल गुंड करत आहेत.
ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश बोलके यांच्या सूचनेनुसार पार पडली. यामध्ये पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड, कांतीलाल गुंड आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


