वैजापूर रोहित पठारे हत्याकांड: वंचित बहुजन आघाडी आक्रमक; पोलीस अधीक्षकांना निवेदन देत न्यायाची मागणी, जखमी भावाची घेतली भेट

औरंगाबाद: वैजापूर तालुक्यातील रोहित पठारे यांच्या हत्येप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या शिष्टमंडळाने पठारे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यानंतर औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करत प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. हे निवेदन परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आरती पवार यांनी स्वीकारले.

पठारे कुटुंबीयांचे सांत्वन आणि वस्तुस्थितीची पाहणी
वंचित बहुजन आघाडीच्या एका प्रमुख शिष्टमंडळाने वैजापूर येथे जाऊन मयत रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांकडून संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. या संवादातून समोर आलेल्या महत्त्वाच्या मुद्यांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
जखमी तुषार पठारे यांची रुग्णालयात भेट
या जीवघेण्या हल्ल्यात मयत रोहित पठारे यांचे लहान भाऊ तुषार पठारे हेदेखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिष्टमंडळाने थेट रुग्णालयात जाऊन तुषार पठारे यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.

न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार: वंचित आघाडी
रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या या अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे पाठीशी उभी आहे. जोपर्यंत या प्रकरणात सर्व आरोपींना अटक होऊन पीडित कुटुंबाला पूर्ण न्याय मिळत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा लढा शांत बसणार नाही, असा इशारा शिष्टमंडळाने यावेळी दिला.
शिष्टमंडळातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित
या शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, मध्य शहराध्यक्ष मिलिंद बोर्डे, जिल्हा महासचिव अंजन साळवे, जिल्हा संघटक राजन किर्तने आणि प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई यांचा प्रामुख्याने सहभाग होता. याशिवाय युवा आघाडी मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव, आशुतोष नरवडे, संदीप कंठे, योगेश सोनवणे, भीमरत्न कांबळे आणि कुणाल गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही बातमी कशी वाटली?
टॅग: तुषार पठारे, रोहित पठारे, वंचित बहुजन आघाडी, वैजापूर





प्रतिक्रिया व्यक्त करा