डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन: चैत्यभूमीवर १ डिसेंबरपासूनच सर्व सुविधा सज्ज ठेवा; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निर्देश
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर १ डिसेंबरपासून सुविधा सज्ज ठेवण्याचे रामदास आठवले यांचे निर्देश; सुरक्षा, आरोग्य व वाहतुकीवर भर.

मुंबई:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर देश-विदेशातून येणाऱ्या लाखो अनुयायांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी सर्व आवश्यक सुविधा १ डिसेंबरपासूनच उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. आयोजनाची सर्व कामे वेळेत पूर्ण करून त्यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी संबंधित विभागांना दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, सहायक पोलीस आयुक्त मनोज जोशी, एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक सागर पळसुले यांच्यासह विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि समन्वय समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सुरक्षा, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य
महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी अलोट गर्दी लक्षात घेता सर्व प्रशासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचना ना. आठवले यांनी दिल्या. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, चोख सुरक्षा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांना प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. चैत्यभूमी व दादर परिसरात पुरेसा वैद्यकीय कर्मचारी वर्ग, सुसज्ज रुग्णवाहिका, सीसीटीव्ही यंत्रणा आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात यावा. तसेच ४ ते ६ डिसेंबर या कालावधीसाठी सर्वंकष सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तातडीने तयार करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले.
अनुयायांसाठी विशेष वाहतूक व्यवस्था व उपक्रम
दूरवरून येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी बेस्ट (BEST) आणि एसटी (MSRTC) महामंडळातर्फे अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय, मुंबईतील ऐतिहासिक व आंबेडकरी चळवळीशी निगडित स्थळांच्या भेटीसाठी अनुयायांना मोफत वातानुकूलित (AC) बससेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या.
ड्रोन शो आणि वैचारिक उपक्रमांचे आयोजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ५ व ६ डिसेंबर रोजी विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत:
- चैत्यभूमी परिसरात भव्य ड्रोन शो, जीवनकार्यावर आधारित प्रदर्शन व माहितीपटांचे स्क्रीनिंग.
- विविध वैचारिक पुस्तकांची दालने आणि ‘बार्टी’ (BARTI) च्या लोककल्याणकारी योजनांचे माहिती स्टॉल्स.
- वृक्षारोपण तसेच व्यसनमुक्ती जनजागृती मोहीम.
- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘लोकराज्य’ मासिकाचा अभ्यासपूर्ण विशेषांक नामवंत विचारवंतांच्या लेखांसह प्रकाशित करणे.
विकासकामे व प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न निकाली काढण्याचे आदेश
दादर परिसरातील प्रस्तावित संविधान मार्गासह चैत्यभूमी परिसरातील प्रलंबित विकासकामे जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले. तसेच चैत्यभूमी परिसराशी संबंधित प्रलंबित प्रॉपर्टी कार्डचा प्रश्नही तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश ना. रामदास आठवले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यंदा सर्व यंत्रणांनी अधिक सजग राहून १ डिसेंबरपासूनच सेवा पूर्ववत व तत्पर ठेवाव्यात, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
ही बातमी कशी वाटली?
टॅग: चैत्यभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महापरिनिर्वाण दिन, रामदास आठवले





प्रतिक्रिया व्यक्त करा