पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी खूशखबर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने मुलाखत परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना एकरकमी १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या बार्टी या स्वायत्त संस्थेकडून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते. याच उपक्रमाचा भाग म्हणून MPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी (मुलाखत) पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना ही आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुंबई किंवा पुणे येथे जाऊन मॉक इंटरव्यू, दिल्ली/पुण्यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शैक्षणिक साहित्याची खरेदी करावी लागते. या प्रवासात आणि तयारीत होणारा आर्थिक भार हलका व्हावा, या उद्देशाने बार्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
असा करा ऑनलाईन अर्ज
पात्र उमेदवारांनी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.barti.in) जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. अर्ज करताना उमेदवाराचे प्रवेशपत्र, मुख्य परीक्षेचा निकाल, जातीचे प्रमाणपत्र आणि बँक पासबुकची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. सर्व पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
#BARTI #MPSC2026 #PuneNews #SocialJustice #NirbhidVartman



1 Comment
Pingback: MPSC आक्रोश मोर्चा पुण्यात ७ सप्टेंबरला; विद्यार्थी-शिक्षक रस्त्यावर