पुणे (प्रतिनिधी):- पुण्यातील कर्वेनगर भागात असलेल्या ‘मंगलमूर्ती गॅस’ या ठिकाणी सुरू असलेल्या जीवघेण्या अवैध गॅस रिफिलींग आणि साठवणुकीच्या काळ्या धंद्यावर रिपब्लिकन संघर्ष सेनेने धडक कारवाई करत मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने या ठिकाणी प्रत्यक्ष धाड टाकून शहानिशा केली आणि त्यानंतर पोलिसांना पाचारण करत संबंधित आरोपींना पोलिसांच्या हवाली केले.
नेमकी घटना काय?
कर्वेनगर येथील मंगलमूर्ती गॅस येथे अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी करणे आणि बेकायदेशीरपणे गॅस रिपेरिंगचे काम सुरू असल्याची खात्रीशीर माहिती रिपब्लिकन संघर्ष सेनेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आयु. शशिकांत कांबळे साहेब यांच्या आदेशानुसार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट दिली असता, तिथे अत्यंत धोकादायक पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसून आले.

संघटनेने तात्काळ वारजे माळवाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता, गॅस रिफीलींसाठी वापरला जाणारा विशिष्ट डिझाइनचे पाईप, २० ते ३० छोट्या गॅस टाक्या, १० ते १२ भारत गॅससह विविध नामांकित कंपन्यांचे मोठे गॅस सिलेंडर आणि माल वाहतुकीसाठी वापरला जाणारा एक टाटा कंपनीचा टेम्पो असा मोठा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून दुकान चालकाला ताब्यात असुन रिपब्लिकन संघर्ष सेनेच्या वतीने वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर रिपब्लिकन संघर्ष सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सचिव श्रीकांत दारोळे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“नागरिकांच्या जीवाशी खेळ आणि घरगुती गॅस सिलेंडरमधून चोरीचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. या माफियांच्या विरोधात आम्ही मा. पोलीस आयुक्त सो. पुणे, मा.पोलीस आयुक्त सो. पिंपरी चिंचवड, मा. जिल्हाधिकारी सो. पुणे जिल्हा, जिल्हा पुरवठा अधिकारी, वजन मापे कार्यालय यांना सविस्तर पत्रव्यवहार केला आहे. मात्र, प्रशासनाला याचे गांभीर्य नाही असेच दिसून येते. अजूनही कोणतीही ठोस कारवाई प्रशासनाकडून झालेली नाही,” असा संताप श्रीकांत दारोळे यांनी व्यक्त केला.
‘जनआंदोलन करू, पण गॅस चोरांना सोडणार नाही’
दारोळे यांनी पुढे इशारा दिला की, “जर प्रशासनाने या प्रकारावर तात्काळ आणि कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक पावले उचलली नाहीत, तर रिपब्लिकन संघर्ष सेना रस्त्यावर उतरेल. गोरगरिबांच्या हक्काचा आणि कष्टाच्या पैशातून घेतलेला गॅस चोरणाऱ्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या लढ्यात वेळप्रसंगी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण जनतेच्या सुरक्षिततेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. लवकरच याविरोधात मोठे जनआंदोलन उभारले जाईल.”
रहिवासी भागात अशा प्रकारे अवैध गॅस रिफिलिंग आणि साठवणूक करणे म्हणजे जिवंत बॉम्बवर राहण्यासारखे आहे. रिपब्लिकन संघर्ष सेनेच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी अशा इतर केंद्रांवरही कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
वारजे माळवाडी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा शोध घेत आहेत.


