मुख्य मजकुराकडे जा
, २७ सप्टेंबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
निवनिर्भीडवर्तमान

निडर लेखणी, निष्पक्ष बातमी..!

ब्रेकिंग
महाराष्ट्र

गोवंडीत ‘वंचित’चा जन आक्रोश मोर्चा: प्रलंबित मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न; आंदोलकांना मारहाण, तणाव निर्माण..!

✍
3 मिनिटे वाचन

गोवंडी, मुंबई: गोवंडी परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत नागरी प्रश्नांवर प्रशासन आणि महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेशाच्या वतीने काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाला आज तणावाचे स्वरूप आले. प्रशासकीय निष्काळजीपणा आणि दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या शेकडो नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, पोलिसांनी या मोर्चातील अनेक आंदोलक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मारहाण करून ताब्यात घेतल्याने परिसरात काही काळ गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता.

या मोर्चात महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. महिलांनी अत्यावश्यक नागरी सुविधांसाठी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. सामान्य नागरिकांचीही मोठी उपस्थिती होती, ज्यांनी मूलभूत सुविधांसाठी आवाज उचलला.

📢 नागरिकांच्या प्रमुख ९ मागण्या: कायमस्वरूपी पुनर्वसन, पाणीटंचाई व शताब्दी रुग्णालयाचे खासगीकरण

या जन आक्रोश मोर्चाद्वारे नागरिकांनी प्रशासनासमोर आपल्या ९ प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत. या मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

१. पुनर्वसन आणि नुकसान भरपाई

* भारत नगर दरड दुर्घटनेतील १२३ कुटुंबांना कायमस्वरूपी पुनर्वसन: १८ जुलै २०२१ रोजी दरड कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर १२३ कुटुंबांना तात्पुरते पुनर्वसन देण्यात आले, परंतु आजतागायत कायमस्वरूपी घरे न मिळाल्याने तसेच त्यांच्या वीज-पाणी सुविधा खंडित केल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. या कुटुंबांना तातडीने कायमस्वरूपी घरे उपलब्ध करण्याची मागणी आहे.

* पांजरापोळ टनेल व डोंगर उतारावरील १४०० झोपड्यांना स्थानिक पुनर्वसन: १४०० झोपड्यांचे स्थलांतर न करता, शेजारील महानगरपालिकेच्या भूखंडावर इमारत बांधून जागेवरच (In-situ) पुनर्वसन घरे देण्याची मागणी आहे.

२. पाणी आणि आरोग्य सुविधा

* सह्याद्री नगर–भारत नगर डोंगरवस्तीतील पाणीटंचाई दूर करून नवीन पाण्याची टाकी बांधावी: डोंगरावरील वस्तीत पाणी कमी दाबाने येत असल्याने पाणी मिळत नाही. तातडीने अतिरिक्त दाबाने पाणी सोडून, नवीन पाण्याची टाकी बांधण्यासाठी सर्वेक्षण व नियोजन सल्लागार नेमण्याची मागणी आहे.

* शताब्दी हॉस्पिटलचे खासगीकरण रद्द करून ते महापालिकेकडूनच चालवावे: एम पूर्व विभागात मोठे पालिकेचे रुग्णालय नसल्याने गरीब नागरिकांची गैरसोय होत आहे. शताब्दी हॉस्पिटलचे खासगीकरण (Privatization) तात्काळ रद्द करून ते सार्वजनिक रुग्णालय म्हणून पालिकेकडूनच चालवावे.

३. अतिक्रमण आणि स्वच्छता

* वाशी नाका (आरसी मार्ग) येथील गुंड प्रवृत्तीचे अतिक्रमण हटवून रेलिंग बसवावे: आरसी मार्गावरील फुटपाथवर झालेले अतिक्रमण तातडीने हटवून त्यावर रेलिंग बसवण्याची मागणी आहे.

* जय भवानी मार्ग–अयोध्या नगर परिसरातील दुकानदारांचे अतिक्रमण हटवावे: रस्त्यावर दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अतिक्रमण काढून स्थायी रेलिंग बसवावे.

* शौचालयांची दुरुस्ती व पाहणी: पांजरापोळ, भारत नगर, सह्याद्री नगर, इंदिरा नगर येथील शौचालये दयनीय स्थितीत असून, त्यांची साफसफाई, दुरुस्ती व सुविधांची पूर्तता करावी. तसेच या शौचालयांची नागरिकांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी करावी.

* विभागातील मोठे व छोटे नाले स्वच्छ करून गाळ तात्काळ उठवावा: नाले वेळेवर साफ न केल्याने घाणीचा त्रास व डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढत आहे. नाल्यातील गाळ तातडीने काढून नाले पूर्णपणे स्वच्छ ठेवावेत.

४. पर्यावरण

* बांधकामांमुळे वाढलेले वायु प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने कारवाई करावी: लोकवस्तीजवळ सुरू असलेल्या मोठ्या बांधकामांमुळे वाढलेले धूळ, धूर आणि प्रदूषण रोखण्यासाठी वॉर्डस्तरावर नियुक्त पथकाने त्वरित कारवाई करावी. नागरिकांच्या प्रतिनिधींसोबत प्रकल्पस्थळी जाऊन तपासणी करून आदेश देण्याची मागणी आहे.

प्रशासनाने नागरिकांच्या या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याची भूमिका ‘वंचित बहुजन आघाडी’च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

ही बातमी कशी वाटली?

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.