पुणे: शहरातील कोथरूड, वानवडी, एनआयबीएम रोड, उंड्री आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांच्या (सोसायटी) व्हॉट्सॲप ग्रुपवर सध्या मुले पळवणारी महिला फिरत असल्याचे मेसेज वेगाने व्हायरल होत आहेत. या मेसेजमुळे पालकांमध्ये मोठे भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हे सर्व मेसेज पूर्णपणे बनावट आणि अफवा असल्याचे स्पष्टीकरण पुणे शहर पोलिसांनी दिले आहे.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या या संदेशांमध्ये दावा केला जात होता की, इंग्रजी व हिंदीत बोलणारी एक महिला सोसायट्यांमध्ये घुसून लहान मुलांना खाऊचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांकडे यासंदर्भात कोणतीही नोंद नसून अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. नागरिकांमध्ये नाहक घबराट पसरवण्यासाठीच हे मेसेज फिरवले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
अशी माहिती पुढे फॉरवर्ड करू नका; पोलिसांचे आवाहन
पुणे पोलिसांनी नागरिकांना आणि विशेषतः पालकांना शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही अपूर्ण अथवा खात्री न केलेल्या सोशल मीडिया फॉरवर्ड्सवर विश्वास ठेवू नये आणि ते पुढे ग्रुपवर पाठवू नयेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करताना जबाबदारीने वर्तन करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
संशयास्पद हालचाली दिखल्यास ११२ वर संपर्क साधा
जर सोसायटी किंवा परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळून आल्यास स्वतः कायदा हातात न घेता किंवा सोशल मीडियावर अफवा न पसरवता तात्काळ ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. खोड्या करून समाजात भीती पसरवणाऱ्या मेसेज तयार करणाऱ्यांवर सायबर पोलिसांची नजर असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
#PunePolice #FactCheck #PuneNews #CyberCrime #NirbhidVartman


