सोलापूर: जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या अचानक आपत्कालीन भारनियमनामुळे सर्वसामान्य नागरिक आणि कृषी पंपधारक शेतकऱ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारनियमनाचे योग्य नियोजन करा आणि आपत्कालीन भारनियमन करणे अपरिहार्य असल्यास नागरिकांना त्याची पूर्वसूचना द्या, असे खडे बोल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
जिल्ह्यातील वीजपुरवठ्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत पालकमंत्री गोरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता उपस्थित होते.
अचानक भारनियमनामुळे शेतकरी व नागरिक हैराण
बैठकीत अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी मागील दोन दिवसांत अनुक्रमे चार आणि सहा तास आपत्कालीन भारनियमन करण्यात आल्याची माहिती दिली. यावर पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विनापूर्वसूचना होणाऱ्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामात अडथळे येतात आणि नागरिकांना नाहक त्रास होतो. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले.
पंढरपूरच्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस
दरम्यान, पंढरपूर विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याने केलेल्या एका आक्षेपार्ह विधानाची गंभीर दखल पालकमंत्र्यांनी घेतली. संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावून त्याचा खुलासा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
ग्राहकांशी सौहार्दपूर्ण संवादाचे निर्देश
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी फोन किंवा प्रत्यक्ष भेट देऊन विचारणा केल्यास अधिकाऱ्यांनी उद्धटपणा न करता सौहार्दपूर्ण व समाधानकारक उत्तरे द्यावीत. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनीही सर्व विद्युत अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारींचे संयमाने निरसन करण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.
#SolapurNews #JaykumarGore #MSEDCL #LoadShedding #Pandharpur #NirbhidVartman


