पुणे प्रतिनिधी:- पुणे शहर आणि परिसरात ट्रान्सफॉर्मर (डीपी) चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-७ ने पर्दाफाश केला आहे. वाडेगाव, ता. हवेली येथे सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली असून, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८ डीपी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत सुमारे ₹१२ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा युनिट-७ चे अधिकारी आणि अंमलदार गस्त घालत असताना पोलीस अंमलदार विनायक साळवे यांना वाडेगाव परिसरात डीपी चोरी करणारे इसम येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना देण्यात आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे आणि पथकाने तत्काळ कारवाईची आखणी केली.
पथकाने वाडेगाव येथे सापळा रचून संशयित मालवाहू टेम्पो क्रमांक MH 12 GT 6675 चा पाठलाग केला. टेम्पोसह तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. अटक केलेल्यांमध्ये मोहम्मद साहेबजान मंगरेखान (वय ३०, रा. गोटेमाळ, सासवड, ता. पुरंदर), आदर्श चंद्रप्रकाश पांडे (वय २२) आणि चंद्रसेन शिवरतन धारिया (वय २८) यांचा समावेश आहे.
चौकशीत मागील पाच ते सहा महिन्यांत लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडेगाव, अष्टापूर, सांगवी सांडस, न्हावी सांडस आणि हिंगणगाव येथील डीपी/ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या तपासातून एकूण ८ गुन्हे उघडकीस आले.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२४(४) तसेच भारतीय विद्युत अधिनियमाच्या कलम १३६ अन्वये नोंद असलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यात आला. पोलिसांनी या कारवाईत अंदाजे ₹१२,७३,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, संबंधित तिघांना ६ सप्टेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट-७ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व पथकाने केली.
#PunePolice #PuneCrime #DPTheft #CrimeBranch #NirbhidVartmaan


