पुणे: MPSC पेपरफुटीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा आणि या पदावर स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, यासह विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात विराट आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
सोमवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर चौक (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल) येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा MPSC आक्रोश मोर्चा नेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. ‘विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या भूमिकेतून आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
मोर्चाच्या परवानगीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त ऋषिकेश रावले आणि मिलिंद मोहिते यांची भेट घेऊन मोर्चाला परवानगी देण्याची विनंती करण्यात आली. या वेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सुनील माने, प्रमोद पाटील, विविध क्लासेसचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम
आयोजकांनी सरकारला दोन दिवसांचा वेळ देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. या कालावधीत MPSC अध्यक्षांबाबत निर्णय न झाल्यास तसेच विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने पाठिंबा देणार असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले. आगामी आंदोलनात विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा दावा करण्यात आला आहे.
#MPSC #आक्रोशमोर्चा #PuneNews #StudentProtest #NirbhidVartman


