पुणे ग्रामीण:- नारायणगाव (१४ नंबर) येथील ‘तुळजाभवानी‘ आणि ‘बढे ची बारी‘ या कला केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईनंतर आता हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही दिलेल्या अधिकृत तक्रारीवरूनच प्रशासनाने ही कारवाई केली असल्याचे पत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले असून, यामुळे कला केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेले अवैध धंदे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत, असा दावा भीम संस्कार ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी केला आहे. मात्र, प्रशासनाने केलेली ही कारवाई अत्यंत तोकडी असून, आम्हाला केवळ दोन किरकोळ गुन्हे नको आहेत, तर या केंद्रांचे परवाने तात्काळ निलंबित (रद्द) करण्यात यावेत, अशी आक्रमक मागणी दारोळे यांनी केली आहे.

शशिकांत दारोळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “आम्ही पुराव्यांसह केलेल्या तक्रारीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला शेवटी मौजे वडगाव कांदळी येथील तुळजाभवानी कला केंद्राशेजारील शेडवर आणि बढेची बारी रसिकराज येथील शेडवर छापे टाकावे लागले. या छाप्यात अक्षय अनिल धोंगडे आणि चंद्रकांत देवराम भोर यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या पत्रावरून हे सिद्ध होते की, या कला केंद्रांच्या आडून बेकायदेशीर मद्यविक्री आणि अनैतिक कृत्ये राजरोसपणे सुरू आहेत.
केवळ दोन कारवाया करून पळवाट काढू नका!”
दारोळे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, या कला केंद्रांमध्ये दररोज लाखो रुपयांची अघोषित आर्थिक उलाढाल आणि महसूल चोरी होत आहे. अशा मोठ्या संघटित गुन्हेगारीवर केवळ दोन गुन्हे नोंदवून आणि काही हजारांचा मुद्देमाल जप्त करून मूळ मालकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. कला केंद्राच्या अटी व शर्तींचे क्रूर उल्लंघन झाले असल्यामुळे, ही केंद्रे कायमस्वरूपी सील झाली पाहिजेत.
वेळप्रसंगी तीव्र आंदोलनाचा इशारा:
“प्रशासनाने तात्पुरती कारवाई करून हा अर्ज निकाली काढला असला, तरी आमचा लढा संपलेला नाही. जर उत्पादन शुल्क विभाग आणि गृह विभागाने या दोन्ही कला केंद्रांचे अधिकृत परवाने कायमस्वरूपी रद्द केले नाहीत, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आंबेडकर आणि भीम संस्कार ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र ठिय्या आंदोलन छेडू,” असा स्पष्ट आणि गर्भित इशारा शशिकांत दारोळे यांनी प्रशासनाला दिला आहे.
या भूमिकेमुळे आता नारायणगाव परिसरातील कला केंद्रांच्या मालकांचे धाबे दणाणले असून, प्रशासन यावर दोन्ही केंद्रांचे परवाने निलंबित करणार की आंदोलनाला सामोरे जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


