पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; आता शासकीय रुग्णालयांतून मिळणार मोफत औषधे आणि सप्लिमेंट्स.!

पुणे: राज्यात पोलीस भरती, अग्निवीर तसेच इतर शारीरिक चाचणी आवश्यक असलेल्या भरतीची तयारी करणाऱ्या लाखो गरीब व होतकरू तरुण-तरुणींसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांच्या निर्देशानुसार, भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शासकीय आरोग्य संस्थांमार्फत आवश्यक औषधे, जीवनसत्त्वे आणि सप्लिमेंट्स पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याबाबतचे परिपत्रक आरोग्य सेवा आयुक्तालय, पुणे यांनी २८ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित केले आहे.
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील लाखो विद्यार्थी पहाटे ४ वाजल्यापासून मैदानावर धावण्याचा आणि शारीरिक चाचणीचा अथक सराव करतात. या कष्टामुळे अनेकांना थकवा, कॅल्शियमची कमतरता, अशक्तपणा, स्नायूंची दुखापत आणि तीव्र उन्हामुळे डिहायड्रेशन यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. खाजगी मेडिकलमध्ये ही औषधे आणि प्रोटीन सप्लिमेंट्स महाग असल्याने तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे गरीब विद्यार्थ्यांना ती घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांमार्फत ही मोफत सेवा देण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थ्यांना कोणती औषधे मोफत मिळणार?
* जीवनसत्त्वे (Multivitamin), कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-D गोळ्या
* आयर्न व फॉलिक ॲसिड गोळ्या आणि प्रोटीन सप्लिमेंट्स
* वेदनाशामक मलम / स्प्रे आणि स्नायू दुखापतीसाठी बाम
* ORS पावडर आणि इलेक्ट्रोलाईट पावडर
* ताप, सर्दी, खोकला यावरील मूलभूत व इतर आवश्यक औषधे
परिपत्रकातील इतर महत्त्वाच्या सूचना:
* स्वतंत्र नोंदणी व मोफत तपासणी: प्रत्येक शासकीय आरोग्य संस्थेमध्ये भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवून त्यांची नोंदणी केली जाईल आणि डॉक्टरांच्या मोफत तपासणीनंतर त्यांच्या सल्ल्यानुसारच औषधे दिली जातील.
* दरमहा विशेष आरोग्य शिबीर: प्रत्येक महिन्याला एकदा संबंधित रुग्णालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले जाईल; यात डिहायड्रेशन, उष्माघात आणि स्नायू दुखापतीपासून बचावाचे मार्गदर्शन केले जाईल.
* मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था: भरतीची तयारी करणाऱ्या मुलींसाठी स्वतंत्र तपासणी कक्ष आणि महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची विशेष व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
* स्थानिक पातळीवर वैद्यकीय कॅम्प: ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, तिथे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मदतीने वैद्यकीय कॅम्प उभारले जातील.
* प्रशिक्षण केंद्रांशी समन्वय: आरोग्य संस्थांनी स्थानिक पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रे, ‘मिशन खाकी’ समन्वयक आणि ग्रामपंचायतींशी समन्वय साधावा.





प्रतिक्रिया व्यक्त करा