शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे : मंत्री अतुल सावे
अतुल सावे यांनी पुण्यातील यशदा येथे वनार्टी प्रशिक्षण शिबिरात शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.

पुणे : शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा प्रत्यक्ष लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय राखून काम करावे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता राखून योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान व परिणामकारक करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले.
पुण्यातील ‘यशदा’ येथे आयोजित राज्यस्तरीय दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ ऑक्टोबरदरम्यान या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजे उमाजी नाईक आणि वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करून मान्यवरांनी अभिवादन केले.
मंत्री अतुल सावे पुढे म्हणाले की, “कोणतीही शासकीय योजना यशस्वी करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांमध्ये सुसंवाद आणि समन्वय असणे अत्यावश्यक आहे. प्रशासकीय नियम व विहित कार्यपद्धतींचे काटेकोर पालन करतानाच क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा अधिक सक्षम, संवेदनशील आणि कार्यक्षम करण्यावर भर दिला पाहिजे. या दोन दिवसीय प्रशिक्षणाच्या माध्यमातून विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान व सुसूत्रपणे होण्यास मोलाची मदत मिळेल.”
या प्रशिक्षण शिबिरास इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अशासकीय सदस्य, विभागाचे क्षेत्रीय अधिकारी तसेच महसूल विभागाचे क्षेत्रीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
उद्घाटन सत्राला भटके-विमुक्त विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उद्धवराव काळे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे, राज्यस्तरीय अशासकीय सदस्य राजेंद्र दोनाडकर, डॉ. संजय पुरी, नरेश पोटे आणि शरद माकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ही बातमी कशी वाटली?
टॅग: अतुल सावे, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे, प्रशिक्षण शिबिर, महात्मा ज्योतिराव फुले, यशदा, वनार्टी, शासकीय योजना





प्रतिक्रिया व्यक्त करा