पुणे जिल्ह्यातील १० दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत अन्नधान्य वाटप सुरू; स्थलांतरितांनाही कोणत्याही रास्तभाव दुकानातून मिळणार धान्य
पुणे जिल्ह्यातील १० दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना मोफत धान्य; स्थलांतरितांना रेशन पोर्टेबिलिटीचा लाभ आणि नवीन पात्र कुटुंबांचा समावेश.

पुणे:- राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी प्रशासनाकडून शासन निर्णयानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दुष्काळामुळे रोजगार अथवा पाण्याच्या शोधात स्थलांतर करावे लागणाऱ्या नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही रास्तभाव दुकानातून धान्य घेता येणार असून, एकही पात्र कुटुंब या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली.
राज्यात जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पर्जन्यमानातील तूट आणि इतर घटकांमुळे प्रभावित झालेल्या ३०४ तालुक्यांमध्ये खरीप हंगाम २०२६ साठी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने अन्नधान्य वितरणाबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
मोफत अन्नधान्य योजनेत नवीन पात्र लाभार्थ्यांचाही होणार समावेश
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा विनाविलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या नागरिकांनी मागणी केल्यास, विहित निकष, उत्पन्न आणि उपलब्ध मर्यादेनुसार त्यांचा समावेश ‘अंत्योदय अन्न योजना’ किंवा ‘प्राधान्य कुटुंब’ प्रवर्गात करण्यात येईल. यासाठी शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार संलग्नीकरण (Aadhaar Seeding) पूर्ण करून त्यांना तातडीने धान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
‘वन नेशन, वन रेशन कार्ड’चा मोठा आधार
दुष्काळामुळे स्थलांतर करणाऱ्या शेतमजूर व नागरिकांना ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेंतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ मिळेल. यामुळे लाभार्थी आपल्या मूळ गावाव्यतिरिक्त राज्यातील अथवा जिल्ह्यातील कोणत्याही सोयीच्या रास्तभाव दुकानातून ई-पॉस उपकरणावर बायोमेट्रिक पडताळणी करून हक्काचे धान्य मिळवू शकतील.
काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावले
‘मिशन सुधार’ अंतर्गत रद्द झालेल्या शिधापत्रिकांचा कोटा विचारात घेऊन दुष्काळग्रस्त भागातील गरजू कुटुंबांना नवीन शिधापत्रिका देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच अन्नधान्याचा काळाबाजार, अवैध साठेबाजी आणि वितरणातील गैरव्यवहार रोखण्यासाठी दक्षता पथकांना सतर्क राहण्याचे आणि नियमित तपासणी करण्याचे कडक निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
ही बातमी कशी वाटली?
टॅग: अन्नसुरक्षा योजना, दुष्काळ, पुणे जिल्हा, मोफत अन्नधान्य, रेशन कार्ड, वन नेशन वन रेशन कार्ड




प्रतिक्रिया व्यक्त करा