रावेत, प्रतिनिधी :- पिंपरी-चिंचवड शहरातील व्यावसायिक आस्थापनांमध्ये सुरक्षेच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) अग्निशमन विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. इमारतीची ‘फायर एनओसी’ असली तरी प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करताना आवश्यक असणारे ‘व्यावसायिक अग्नि सुरक्षितता प्रमाणपत्र’ (Fire Safety Compliance Certificate) न घेणाऱ्या आस्थापनांवर आता थेट कारवाई केली जाणार आहे.
अग्निशमन विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास आणि मुख्य अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरातील बहुतांश पेट्रोल पंप, खासगी रुग्णालये आणि शाळांनी अद्याप हे अनिवार्य प्रमाणपत्र घेतलेले नसल्याचे समोर आले आहे.
शाळा, रुग्णालये आणि पेट्रोल पंपांची धक्कादायक आकडेवारी
महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, शहरातील १०४ पेट्रोल पंपांपैकी केवळ ७ पंपांकडे वैध व्यावसायिक अग्नि सुरक्षितता प्रमाणपत्र उपलब्ध आहे, तर उर्वरित ९७ पेट्रोल पंप विनाप्रमाणपत्र कार्यरत आहेत. याशिवाय शहरातील ५६४ शाळांपैकी केवळ ५८ शाळांकडे हे प्रमाणपत्र असून ५०६ शाळांमध्ये आवश्यक पूर्तता झालेली नाही. आरोग्य क्षेत्राचा विचार केल्यास, ६७४ खासगी रुग्णालये व क्लिनिकपैकी तब्बल ४१४ रुग्णालयांनी अद्याप हे प्रमाणपत्र घेतलेले नाही.
दोन आठवड्यांत अंतिम नोटीस आणि सील ठोकण्याचा इशारा
ज्या आस्थापनांनी अद्याप हे अग्नि सुरक्षितता प्रमाणपत्र घेतलेले नाही, त्यामध्ये पेट्रोल पंप, शाळा, रुग्णालये आणि कोचिंग क्लासेसचा समावेश आहे. या सर्व आस्थापनांना पुढील दोन आठवड्यांत महापालिकेकडून अंतिम नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
नोटीस मिळाल्यापासून संबंधित त्रुटी दूर करून प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी आस्थापनांना एका महिन्याची मुदत दिली जाईल. दिलेल्या मुदतीत आवश्यक पूर्तता न केल्यास संबंधित आस्थापनांवर सील ठोकण्यासह कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा अग्निशमन विभागाने दिला आहे.
#PimpriChinchwad #PCMC #FireSafety #PuneNews #MaharashtraNews


