‘आयआयटी मुंबई दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र’; सुजात आंबेडकरांचा घणाघात
साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर यांनी IIT मुंबईमध्ये जातीय भेदभाव होत असल्याचा आरोप करत प्रशासनावर कारवाईची मागणी केली.

मुंबई : साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर आयआयटी मुंबईतील वातावरण पुन्हा चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आयआयटी मुंबई प्रशासनावर जोरदार टीका करत जातीय भेदभावाच्या तक्रारींवर कठोर भूमिका घेतली.

सुजात आंबेडकर यांनी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूबाबत तीव्र प्रतिक्रिया देताना हा प्रकार केवळ वैयक्तिक दुर्दैवी घटना म्हणून न पाहता संस्थात्मक पातळीवरील गंभीर प्रश्न म्हणून तपासला जावा, अशी मागणी केली. अनिकेत अंभोरे आणि दर्शन सोलंकी यांच्या घटनांचाही उल्लेख करत त्यांनी आयआयटी मुंबईत दलित विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर असल्याचा आरोप केला.
डीन आणि संचालकांच्या राजीनाम्याची मागणी
आंबेडकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आयआयटी मुंबईचे डीन आणि संचालक यांनी तातडीने पदत्याग करावा, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांवरील जातीय छळाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा त्यांनी केला.
वाकोडे कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी
वंचित बहुजन आघाडी पीडित वाकोडे कुटुंबियांच्या पाठीशी उभी असून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत ठोस यंत्रणा उभी राहावी, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणात साहिल वाकोडे यांच्या कुटुंबीयांनीही जातीय भेदभाव आणि छळाचे आरोप केले आहेत. प्रकरणाचा तपास सुरू असून विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनीही यावर भूमिका घेतली आहे.
ही बातमी कशी वाटली?
टॅग: Darshan Solanki, IIT Mumbai, Sujat Ambedkar, दलित विद्यार्थी, निर्भीड वर्तमान, मुंबई बातम्या, साहिल वाकोडे




प्रतिक्रिया व्यक्त करा