मुंबई (प्रतिनिधी):- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम/पश्चिम वॉर्ड (चेंबूर) येथील लिलावातील भंगार व हातगाड्या गोदामातून बाहेर काढून देण्यासाठी १ लाख ७० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वरिष्ठ निरीक्षकासह एका कार्यकारी सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. लाचेचा पहिला हप्ता म्हणून ८० हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने एम/पश्चिम वॉर्ड अंतर्गत झालेल्या हातगाडी व भंगाराच्या लिलावात माल खरेदी केला होता. हा माल गोदामातून बाहेर काढून देण्यासाठी अनुज्ञापन खात्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश गोपाळ साळवे आणि कार्यकारी सहाय्यक विजय सिताराम ठाकरे यांनी शासकीय फी व्यतिरिक्त १ लाख ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
माहुलगाव येथील गोदामात रचला सापळा
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्याकडे तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीनुसार ३ सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता, आरोपी विजय ठाकरे यांनी स्वतःसाठी व वरिष्ठ निरीक्षक रमेश साळवे यांच्यासाठी १ लाख ७० हजारांची मागणी करून पहिला हप्ता ८० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी माहुलगाव येथील भंगाराच्या गोदामात सापळा रचून विजय ठाकरे यांना ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ठाकरे यांनी लाच स्वीकारल्याबाबत मोबाईल फोनवरून माहिती दिली असता वरिष्ठ निरीक्षक साळवे यांनी त्यास होकार व अनुमोदन दिल्याने त्यांनाही कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#ACBMumbai #BriberyCase #MumbaiNews #NirbhidVartman #CrimeNews


