नागरिकांची कामे रखडवणाऱ्या महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई; दररोज दुपारी ३ ते ५ नागरिकांसाठी राखीव
महसूल कार्यालयांमध्ये नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांना दररोज दुपारी ३ ते ५ भेटीसाठी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेण्यास मनाई; अनुपस्थितीत पर्यायी अधिकाऱ्याची नियुक्ती बंधनकारक
विशेष प्रतिनिधी | निर्भीड वर्तमान
मुंबई : महसूल कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारूनही नागरिकांची कामे होत नसल्याच्या वाढत्या तक्रारींची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक पातळीवरच तातडीने निवारण व्हावे, यासाठी महसूल विभागाने महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून नायब तहसीलदार कार्यालयापर्यंतच्या महसूल अधिकाऱ्यांना दररोज दुपारी ३ ते ५ ही वेळ नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या वेळेत नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर आवश्यक कार्यवाही करणे अपेक्षित असून, कामात टाळाटाळ करणाऱ्या किंवा शासनाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
छोट्या कामांसाठी मंत्रालयाच्या फेऱ्या कशाला?
स्थानिक महसूल कार्यालयांमध्ये अधिकारी उपलब्ध नसणे, नागरिकांच्या अर्जांची वेळेत दखल न घेणे, प्रकरणे विनाकारण प्रलंबित ठेवणे आणि तक्रारींचे समाधानकारक निवारण न होणे यामुळे अनेक नागरिकांना अगदी छोट्या कामांसाठीही थेट मंत्रालय गाठावे लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
मंत्रालयात नागरिकांची होणारी गर्दी कमी करणे, स्थानिक स्तरावरच तक्रारी निकाली काढणे आणि महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व उत्तरदायी बनवणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.
प्रत्येक कार्यालयात अभ्यागतांची मध्यवर्ती नोंदवही
प्रत्येक महसूल कार्यालयामध्ये नागरिक आणि अभ्यागतांची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र मध्यवर्ती नोंदवही ठेवावी लागणार आहे. नागरिकाचे नाव, संपर्क क्रमांक, भेटीचे कारण, संबंधित शाखा किंवा अधिकारी आणि अर्जावर झालेली कार्यवाही यांची नोंद या नोंदवहीत घेणे अपेक्षित आहे.
जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध राहणे बंधनकारक असेल.
नागरिकांच्या वेळेत बैठक आणि ‘व्हीसी’ला मनाई
नागरिकांसाठी राखीव असलेल्या दुपारी ३ ते ५ या कालावधीत कोणतीही अंतर्गत बैठक अथवा व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांना अधिकाऱ्यांची भेट घेता यावी आणि त्यांच्या तक्रारींवर प्रत्यक्ष चर्चा करता यावी, यासाठी हा कालावधी पूर्णपणे राखीव ठेवण्यात आला आहे.
कार्यालयाबाहेर सूचना फलक लावणे अनिवार्य
नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित करण्यात आलेल्या वेळेची माहिती देणारा स्पष्ट आणि सहज दिसणारा सूचना फलक प्रत्येक महसूल कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तसेच संबंधित अधिकाऱ्याच्या दालनाबाहेर लावावा लागणार आहे.
यामुळे नागरिकांना अधिकाऱ्यांच्या भेटीची वेळ समजेल आणि कार्यालयात आल्यानंतर अनावश्यक प्रतीक्षा करावी लागणार नाही.
अनुपस्थित राहायचे असल्यास पूर्वकल्पना द्यावी लागणार
अतितातडीचे शासकीय काम, मंत्री किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा अथवा उच्चस्तरीय बैठकीमुळे संबंधित अधिकारी दुपारी ३ ते ५ या वेळेत उपस्थित राहू शकणार नसल्यास, त्याची पूर्वकल्पना सूचना फलकावर प्रसिद्ध करणे आवश्यक असेल.
त्याचबरोबर नागरिकांचे अर्ज आणि तक्रारी स्वीकारण्यासाठी पर्यायी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे. त्यामुळे मुख्य अधिकारी अनुपस्थित असल्याचे कारण देऊन नागरिकांना परत पाठवता येणार नाही.
कडक अंमलबजावणीचे निर्देश
महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी व्यंकटेश आयलाने यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासकीय विभागांना या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.
या आदेशाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाल्यास महसूल कार्यालयांमध्ये नागरिकांची होणारी ससेहोलपट कमी होऊन प्रलंबित कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, सूचना फलक लावण्यापुरतीच ही योजना मर्यादित राहणार की प्रत्यक्षात नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण होणार, याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी कशी वाटली?
टॅग: जिल्हाधिकारी, तहसीलदार, नागरिकांच्या तक्रारी, महसूल विभाग, महाराष्ट्र शासन




Leave a Reply