संगमनेर (विशेष प्रतिनिधी):- सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराची साखळी कशी काम करते आणि स्वतःचे हात काळे न करता अधिकारी खाजगी व्यक्तींना कसे ‘बळीचा बकरा’ बनवतात, याचे जिवंत उदाहरण संगमनेर तालुक्यात समोर आले आहे. शेतजमिनीच्या सपाटीकरणावर अवैध गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५,००० रुपयांची लाच घेताना नितीन किसन खर्डे या खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. मात्र, या संपूर्ण प्रकरणात लाचेची मागणी ज्यांच्या नावावर झाली, ते मंडळ अधिकारी आणि तलाठी तूर्तास बाजूला राहिले असून, वसुली करणारा खाजगी एजंट मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
कार्यालयात बैठक, बाहेर सेटिंग? काय आहे मूळ हकीकत?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, तक्रारदार हे जेसीबी मशीनने शेतजमीन सपाटीकरणाचे काम करतात. ८ जून २०२६ रोजी खाजगी इसम नितीन खर्डे याने तक्रारदाराला थेट तलाठी कार्यालयात बोलावून घेतले होते. विशेष म्हणजे, त्या वेळी कार्यालयात मंडळ अधिकारी आणि तलाठी स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी तक्रारदाराशी कामाबाबत चर्चाही केली.
परंतु, सरकारी नियमांचा आणि कारवाईचा धाक दाखवण्याचा खरा खेळ कार्यालयाच्या बाहेर सुरू झाला. तक्रारदार कार्यालयातून बाहेर पडत असताना, खाजगी इसम नितीन खर्डे याने त्यांना गाठले आणि “मंडळ अधिकारी यांच्याकरिता ५,००० रुपये द्यावे लागतील, नाहीतर अवैध उत्खननाचा गुन्हा दाखल करू,” अशी उघड धमकी दिली.
एसीबीचा सापळा यशस्वी, पण ‘मुख्य मासे’ गळाला लागणार का?
लाचखोरीच्या या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे धाव घेतली. २२ जून २०२६ रोजी रचलेल्या सापळ्यात खाजगी इसम नितीन खर्डे याने ५०० रुपयांच्या १० नोटा (एकूण ५,००० रुपये) स्वीकारताच त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
येथे सर्वात मोठा यक्षप्रश्न निर्माण होतो
“एक खाजगी व्यक्ती स्वतःच्या हिमतीवर कोणत्याही नागरिकाला सरकारी कारवाईची धमकी देऊ शकते का? जर ८ जून रोजी तलाठी कार्यालयात मंडळ अधिकारी व तलाठ्यांसोबत बैठक झाली होती, तर त्या बैठकीनंतर लगेचच खाजगी इसमाने मंडळाधिकाऱ्यांच्या नावावर लाच का मागितली? ही साखळी पूर्वनियोजित नव्हती का?”
खाजगी कर्मचाऱ्यांचा ‘ढाल’ म्हणून वापर!
अनेक सरकारी कार्यालयांमध्ये सध्या एक नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. लाचेचे पैसे घेताना स्वतः पकडले जाऊ नये म्हणून अधिकारी वर्ग कार्यालयाच्या आवारात किंवा आसपास फिरणाऱ्या काही खाजगी व्यक्तींना (एजंट/पंटर) हाताशी धरतात. पैसे गोळा करण्याचे, धमकावण्याचे आणि सौदेबाजी करण्याचे काम हे खाजगी लोक करतात. पैसे सुरक्षितपणे पोहोचले की साहेबांचे काम होते, पण जर एसीबीचा छापा पडला, तर लाचेची रक्कम हातात असणारा खाजगी माणूस ‘बळीचा बकरा’ बनतो आणि मुख्य अधिकारी कायदेशीर पळवाटा शोधून नामानिराळे राहतात.
आता जनतेचे लक्ष एसीबीच्या पुढील तपासाकडे.!
या प्रकरणात लाचेची रक्कम थेट खाजगी इसमाच्या हातातून जप्त झाली असली, तरी लाचेची मागणी मंडळ अधिकारी यांच्याकरिता’ करण्यात आली होती, हे एसीबीच्या रेकॉर्डवर स्पष्ट आहे. त्यामुळे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग केवळ या खाजगी व्यक्तीवर कारवाई करून थांबणार, की ज्यांच्या नावावर ही खंडणी वसूल केली जात होती, त्या संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांची कडक चौकशी करून त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करणार? याकडे संगमनेर तालुक्यातील जनतेचे आणि शेतकाऱ्यांचे बारकाईने लक्ष लागले आहे.


