पुणे

दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त दक्षिण कमांडने केले स्मृती कार्यक्रमाचे आयोजन..!!

दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या कन्या कृतिका रावत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम स्मरणीय झाला.

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा

पुणे:- भारतीय सशस्त्र दलांचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त दक्षिण कमांडने गुरुवारी एका स्मृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हा कार्यक्रम एका चर्चासत्राच्या स्वरूपात संमिश्र पद्धतीने आयोजित करण्यात आला होता, ज्याची संकल्पना  “भारतीय सशस्त्र दलांसाठी परिवर्तनाची अत्यावश्यकता” अशी होती. जनरल बिपिन रावत यांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर तसेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असताना ज्या मुद्द्यांवर त्यांनी अथक लक्ष केंद्रित केले , त्यावर चर्चा करणे हा या मागचा उद्देश होता. दक्षिणी कमांड मुख्यालय आणि पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र यांनी कमांड हॉस्पिटल, पुणे येथे संयुक्तपणे चर्चासत्राचे आयोजन केले होते.दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या कन्या कृतिका रावत यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम स्मरणीय झाला.

दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम  यांनी आपल्या प्रारंभिक भाषणात दिवंगत जनरल बिपिन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्र मजबूत करण्यासाठी पारंपारिक मूल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान यांमध्ये विना अडथळा एकीकरणासाठी पहिल्या सीडीएसनी मांडलेल्या रुपरेषेवर आर्मी कमांडर यांनी भाष्य केले.  सध्याच्या भू-राजकीय व्यवस्थेत भारताचा वाढता प्रभाव अधोरेखित करताना त्यांनी भारत आणि सशस्त्र दलांसमोरील आव्हाने स्पष्ट केली.

माजी परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले, माजी संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि लेफ्टनंट जनरल सुब्रत साहा, लेफ्टनंट जनरल संजीव लंगर,लेफ्टनंट जनरल पीएस राजेश्वर, लेफ्टनंट जनरल एसएस हसबनीस, लेफ्टनंट जनरल ए के सिंग,एअर मार्शल एसएस सोमण आणि रिअर अॅडमिरल प्रवीण नायर  यांच्यासारख्या अनेक नामवंत वक्त्यांनी भारतीय सशस्त्र दलांसाठी परिवर्तनाच्या गरजा आणि बारकावे यावर आपले मत मांडले .

या चर्चासत्राला तिन्ही सेवा दलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी,आयएनएस  शिवाजी, पश्चिम नौदल कमांड, मुंबई आणि,लोहगाव हवाई तळ येथील अधिकाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राच्या सदस्यांनीही या चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेतला. दक्षिण कमांड मुख्यालयाच्या सर्व आउटस्टेशन फॉर्मेशन्ससाठी चर्चासत्राचे  थेट प्रक्षेपण करण्यात आले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!