Town Planner Workfree; नागरिकांच्या तक्रारीवरून बेजबाबदार वर्तणूक करणारे शहर नगररचनाकार कार्यमुक्त

उल्हासनगर, निर्भीड वर्तमान:- शहरातील अनेक इमारतीचे बांधकाम नकाशे मंजूर करतांना शहराच्या विकास योजनेतील नियम धाब्यावर बसवून चुकीच्या पध्दतीने बांधकाम नकाशे मंजूर करणे, प्रशासनाचे आदेश नसतांना त्यांची खाजगी कामे करण्याकरीता व्यक्तींना कर्मचारी म्हणून ठेवणे अश्या नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेत बेजबाबदार वर्तणूक करणारे श्री. प्रकाश मुळे यांना नगर रचनाकार, उल्हासनगर महानगरपालिका यांना पदावरुन कार्यमुक्त करण्यात आले आहे.

श्री. प्रकाश एम. मुळे, नगर रचनाकार हे सन २०२१ पासून उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. उल्हासनगर शहराचा विकास २०१७ च्या मंजूर विकास आराखड्यानुसार करणे बंधनकारक आहे. सोबतच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ तसेच एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) मधील तरतूदीनुसार इमारत बांधकाम नकाशे मंजूरीची कार्यप्रणाली अवलंबून बांधकाम नकाशे मंजूर करणे हे नगर रचना विभागाचे मूळ काम आहे.

तरी नगर रचनाकार श्री. प्रकाश मुळे यांनी शहरातील अनेक इमारतीचे बांधकाम नकाशे मंजूर करतांना शहराच्या विकास योजनेतील प्रावधाने व विनियम लक्षात न घेता चुकीच्या पध्दतीने बांधकाम नकाशे मंजूर केले आहेत. जसे १) श्री. नरेश वाधवानी यांचे नावे सुधारीत बांधकाम परवानगी क्र.४४/१९, यामध्ये ३६ मी. व २४ मी. डी.पी. रस्त्यावर बांधकाम परवानगी मंजूर केली. २) श्री. परमानंद कुकरेजा यांचे नावे सुधारीत वांधकाम परवानगी क्र. १०४/१२, यामध्ये सुध्दा सदोष पध्दतीने बांधकाम परवानगीं मंजूर केलेली आहे. तसेच, अनेक प्रकरणात सामासिक अंतरात मा. आयुक्तांची मंजूरी न घेता सूट देवून अनियमितता केलेली आहे. त्यामुळे, मनपाचे विरुध्द विविध न्यायालयात प्रकरणे न्यायप्रविष्ठ होत असून प्रकरणे निस्तारतांना प्रशासकीय वेळ व निधी खर्च होत आहे व त्यामुळे मनपाची नाहक बदनामी होत होती.

दिनांक १४/०१/२०२१ च्या शासन निर्णयानुसार कोरोनाच्या काळात प्रिमियम शुल्कामध्ये ५०% सूट देवून उर्वरित ५० % रक्कम हप्ते न देता प्रत्यक्ष दिनांक ३१/१२/२०२१ पर्यंत भरुन घ्यावयाची होती. परंतू, श्री. प्रकाश मुळे यांच्या दुर्लक्षीपणामुळे व हलगर्जीपणामुळे ५०% सूट द्यावयाच्या प्रकरणात सुध्दा अनियमितता झालेली आहे.

तर श्री. प्रकाश एम. मुळे, यांनी नगररचना विभागात प्रशासनाचे आदेश नसतांना त्यांची खाजगी कामे करण्याकरीता काही व्यक्तींना कर्मचारी म्हणून ठेवले होते. याबाब तक्रारदारांनी निदर्शनास आणून देऊन त्याबाबत मा. जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे व शासन स्तरावर आंदोलने केल्याने तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेवून उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे मध्यवर्ती पोलीस ठाणे, उल्हासनगर-३ येथे श्री. प्रकाश मुळे व इतर ४ यांचे विरुध्द गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून त्याचाही तपास चालू आहे.

तसेच, मा. संचालक, नगर रचना, मा. सह-संचालक, नगर रचना, कोंकण विभाग, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे नागरीकांनी श्री. प्रकाश मुळे यांच्याविरुध्द अनेक तक्रारी केलेल्या असल्याने संचालक, नगर रचना विभाग व शासन स्तरावरुन श्री. प्रकाश मुळे यांच्याबाबत वारंवार विचारणा होत असते त्यामुळे श्री. मुळे यांनी मंजूर केलेल्या सर्व प्रकरणांची फेरतपासणी सहायक संचालक, नगररचना यांनी करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

श्री. मुळे यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात व संबंधीत प्रकरणे तपासण्यात नगररचना विभागाचा विनाकारण बराच वेळ वाया जात आहे.

वरील सर्व वस्तुस्थिती लक्षात घेता, श्री. प्रकाश मुळे यांची बेजबाबदार वर्तणूक सुस्पष्टपणे निदर्शनास येत असल्याने यापुढे बांधकाम परवानगीमध्ये अनियमितता होवू नये व गैरप्रकार घडू नये हि काळजी घेण्याच्या दृष्टीकोणातून श्री. प्रकाश मुळे यांना नगर रचनाकार, उल्हासनगर महानगरपालिका या पदावरुन कार्यमुक्त करण्यात आले आहे.

Exit mobile version