Pune Dry Day : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश

पुणे, निर्भीड वर्तमान :- जिल्ह्यात होत असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका खुल्या, मुक्त, शांतता, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात होण्याच्यादृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्या दिनांकास निर्धारित केलेल्या वेळेच्या ४८ तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिलेले आहेत.

जिल्ह्यात ७ मे म्हणजेच आज तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदार संघात व मावळ, पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्व मद्य विक्रीच्या, ताडी विक्रीच्या व इतर संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार बारामती लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत तसेच मावळ, पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघात ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपासून १३ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत तसेच ४ जून रोजी संपूर्ण दिवसासाठी हे आदेश लागू राहणार आहेत.

निवडणूक निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी, विदेशी, बिअर, वाईन निर्माणी अनुज्ञप्तीधारक बंदच्या कालावधीत उत्पादन करु शकतील. परंतु या कालावधीत कोरडा दिवस लागू असलेल्या क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना देशी, विदेशी मद्याचा पुरवठा करता येणार नाही. तसेच ठोक मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींनी कोरडा दिवस लागू असलेल्या क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना मद्याचा पुरवठा करता येणार नाही.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम १९४९ व त्याअंतर्गत लोकप्रतिनिधीत्व अधिनियमन १९५१ अंतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version