Deputy Chief Minister Ajit Pawar; भिडेवाडा स्मारक विकास आराखड्यांचा पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

‘सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना

पुणे दि. 9 निर्भीड वर्तमान:- क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं पुणे येथील राहतं घर राहिलेला फुलेवाडा तसंच फुले दांपत्यानं मुलींची पहिली शाळा सुरु केलेला भिडेवाडा येथे राष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या विकास आराखड्यांचा (Deputy Chief Minister Ajit Pawar)  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आहे.

भिडेवाडा स्मारक विकास आराखडा आढावा बैठक

देशात स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून शैक्षणिक, सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात क्रांतीकारी कार्य करणाऱ्या फुले दांपत्यासारख्या महामानवांचं स्मारक त्यांच्या कार्याला न्याय देणारं असलं पाहिजे. त्यासाठी हेरिटेज दर्जा आणि आधुनिक वास्तूकलेचा सुरेख मिलाप साधून हे प्रेरणादायी स्मारक तयार करण्यात यावं. स्मारकाच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असा विश्वास बैठकीत अजित पवार यांनी दिला आहे.

भिडेवाडा स्मारक विकास आराखडा आढावा बैठक

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे देशात स्त्रीशिक्षणाची सुरुवात झाली. आज समाजाच्या सर्व क्षेत्रात महिला आत्मविश्वासानं वावरताना दिसतात त्याचं श्रेय सर्वस्वी क्रांतीज्योती सावित्रीबाईंना जाते. त्यामुळे सावित्रीबाईंचं कार्य, स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा, केलेला त्याग याची माहिती शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यातून युवा पिढीला मार्गदर्शन, प्रेरणा मिळाली पाहिजे. यासाठी प्रस्तावित स्मारकांमध्ये फुले दांपत्याच्या जीवनकार्याबद्दलची माहिती देणारे थिएटर, युपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परिक्षांचं मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकासाचं प्रशिक्षण केंद्रासारख्या सुविधा असल्या पाहिजेत. नवे स्मारक पुण्याच्या हेरीटेज वास्तुसौंदर्यात भर घालणारे असले पाहिजे, त्यासाठी आराखड्यावर अधिक काम करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.

याबरोबरच फुले दांपत्याच्या जीवनावर आधारीत ‘सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे कार्य अलौकिक असून ते भावी पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार असल्याने चित्रपटाला करसवलत दिली पाहिजे, असं मत बैठकीत अजित पवार यांनी व्यक्त केले.

 

Exit mobile version