ताज्या घडामोडीदेश विदेश

कोरियन 108 बौद्ध यात्रेकरू 43 दिवसांत 1,100 किलोमीटर अंतराची करणार पदयात्रा..!!

दक्षिण कोरियाच्या सांगवोल सोसायटीने केले आयोजन..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- दक्षिण कोरियाच्या सांगवोल सोसायटीने आयोजित केलेल्या पदयात्रेचा एक भाग म्हणून, कोरिया प्रजासत्ताक मधील 108 बौद्ध यात्रेकरू 43 दिवसांत 1,100 किलोमीटर अंतराची पदयात्रा करतील, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज ही माहिती दिली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेची 50 वर्षे साजरी करत असताना या पदयात्रेला महत्त्व प्राप्त झाले आहे. उभय देशांमधील मैत्री आणि सहकार्य वृद्धिंगत करणे हा  या यात्रेचा उद्देश आहे, असे चंद्रा यांनी सांगितले. यात्रेकरू भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहारमधील बौद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देतील आणि त्यानंतर नेपाळला जाणार आहेत.

हे यात्रेकरू 9 फेब्रुवारी ते 23 मार्च 2023 या कालावधीत भारत आणि नेपाळमधील बौद्ध पवित्र स्थळांच्या 43 दिवसांच्या दौऱ्यावर असतील.  ‘ओह,,वुई  ! ओह, लव्ह ! ओह, लाइफ! ‘या घोषवाक्यासह  बुद्धांचे  जीवन आणि पाऊलखुणा जतन केलेल्या भारतातील तीर्थस्थळांच्या  माध्यमातून भक्तीपर  बौद्ध संस्कृतीच्या  कार्यांचा प्रसार करणे हा सांगवोल सोसायटीने आयोजित केलेल्या यात्रेचा उद्देश आहे. दोन्ही देश राजनैतिक संबंधांच्या 50 वर्षांचा हा ऐतिहासिक टप्पा साजरा करत आहेत त्यामुळे 2023 हे वर्ष उभय  देशांमधील द्विपक्षीय संबंधांसाठी विशेष आहे, असे भारतातील कोरिया प्रजासत्ताकचे राजदूत चांग जे-बोक यांनी सांगितले. भारताकडे जी 20 समूहाचे अध्यक्षपद असताना ही पदयात्रा भारतात येत आहे आणि जी 20 मध्ये भारताच्या यशासाठी दक्षिण कोरिया वचनबद्ध आहे, असेही ते म्हणाले. बौद्ध शिकवणीसारखेच भारताचे जी 20 अध्यक्षपदाचे ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हे ब्रीदवाक्य आहे, असे राजदूतांनी सांगितले.

भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील धार्मिक संबंधांवर बोलताना राजदूत म्हणाले की, हे संबंध दृढ भावना गृत करतात आणि दोन्ही देशातील लोकांमध्ये  प्रचंड सद्भावना निर्माण करतात यामुळे हे द्विपक्षीय संबंधांना बळ देणारे आहे.कोरियातून दरवर्षी हजारो पर्यटक भारताला भेट देतात आणि कोरियन बौद्ध धर्माच्या जोग्ये ऑर्डरच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्र पदयात्रेचे आयोजन केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. वाराणसीतील सारनाथ येथून ही तीर्थक्षेत्र पदयात्रा सुरू होईल आणि नेपाळमधून मार्गक्रमण करून श्रावस्ती येथे या पदयात्रेचा समारोप होईल.ही भव्य बौद्ध तीर्थयात्रा ही आपल्या सामायिक बौद्ध वारशासाठी योग्य आदरांजली आहे. लोकांशी संपर्क अधिक दृढ करण्यासाठीच्या प्रयत्नांना या पदयात्रेमुळे अधिक चालना मिळेल असे राजदूतांनी या पदयात्रेचे  महत्त्व प्रसारमाध्यमांना विशद करताना सांगितले. त्यांनी सांगितले की, यात्रेकरूंमध्ये समावेश असलेले भिक्षू आठ प्रमुख बौद्ध पवित्र स्थळांवर आदरांजली अर्पण करतील भारतीय बौद्ध धर्म आणि संस्कृतीचा अनुभव घेतील आणि धर्मगुरुंशी द्विपक्षीय बैठक घेतील आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना सभा आणि जीवन  सन्मानासाठी आशीर्वाद सोहळा आयोजित करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!