ताज्या घडामोडी

राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम नोव्हेंबर 2022 पर्यंत 4766 किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे बांधकाम पूर्ण..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे 2022-23 या वर्षात 12,200 किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट असून नोव्हेंबर 2022 पर्यंत त्यापैकी 4766 किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

भारतमाला योजनेअंतर्गत, भारताच्या अर्थव्यवस्थेला लॉजिस्टिक कार्यक्षमतेची सुविधा उपलब्ध करणाऱ्या देशातील महामार्ग/जलदगती महामार्गांच्या विकासाव्यतिरिक्त, 35 मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क (एमएमएलपी) विकसित केले जाणार आहेत. हे एमएमएलपी कार्गोचे (वाहतूक केला जाणारा माल) एकत्रीकरण आणि वितरणाची प्रमुख केंद्रे म्हणून काम करतील. 35 एमएमएलपी सह भारतमाला योजनेच्या अंमलबजावणीमुळे देशाची लॉजिस्टिक कार्यक्षमता आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. भारतमाला योजनेअंतर्गत महाराष्ट्र आणि ओडिशासह अन्य राज्यांमध्ये मंजूर झालेल्या 35 एमएमएलपी ची राज्यवार यादी, परिशिष्ट I मध्ये जोडण्यात आली आहे.

भारतमाला योजनेअंतर्गत मालवाहतुकीच्या मार्गांच्या जाळ्यावरील 191 चोक पॉइंट्स (वाहतूक कोंडीच्या जागा) निश्चित करण्यात आल्या आहेत. या 191 चोक पॉइंट्स पैकी 56 जागांवर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठीचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर 83 जागांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम सुरु आहे. वाहतूक कोंडीच्या उर्वरित 52 जागांवरील प्रकल्पांचे काम आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत बांधकामासाठी दिले जाईल. महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यासह देशभरातील वाहतूक कोंडीच्या जागांची सद्यः स्थिती आणि त्यातील सुधारणा याबाबतची माहिती परिशिष्ट II मध्ये जोडण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग आणि जलदगती महामार्ग सुरक्षित करण्यासाठीचा कोणताही प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!