पुणे:- शहरात बेकायदा धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार, लक्ष्मीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येरवड्यातील नाईकनगर परिसरात सुरू असलेल्या हातभट्ट्यांवर धाड टाकून पोलिसांनी हजारो लिटर कच्चे रसायन आणि दारू तयार करण्याचे साहित्य जागीच नष्ट केले.
गुप्त बातमीदाराने फोडले बिंग
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातील अंमलदार गद्दे आणि चव्हाण यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वाची टीप मिळाली होती. स.नं. १४ नाईकनगर, येरवडा येथे काही जण आर्थिक फायद्यासाठी गावठी दारू तयार करत असून, तिथे मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन आणि तयार दारूचा साठा लपवून ठेवल्याचे समजले होते.
मोकळ्या मैदानात धाडसी कारवाई
बातमीची खातरजमा झाल्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, नंदनवार आणि त्यांच्या पथकाने परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी तीन वेगवेगळ्या मोकळ्या जागांवर दारू तयार करण्याचे साहित्य सापडले. पोलिसांनी त्वरित कारवाई करत:
* अंदाजे १००० लिटर कच्चे रसायन जागीच नष्ट केले.
* परिसरातील १० ते १५ हातभट्ट्या शोधून त्या पूर्णपणे तोडून टाकल्या.
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
ही यशस्वी कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त चिलुमुला रजनिकांत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस अंमलदार कांबळे, गडमवाड, अहिवळे, निलख, गायकवाड, बेलके, चुकेवाड, ससाने, होळकर आणि टोपे यांचा समावेश होता.
पुणे पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.


