पुणे:- पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शासनाच्या सहकार विभागाकडून नेमणूक केलेले लिक्विडेटर विनोद माणिकराव देशमुख (वय ५०) आणि सरकारी पॅनलवरील ऑडिटर भास्कर राजाराम पोळ (वय ५६) यांना लाच मागणी व लाच स्वीकारल्याप्रकरणी रंगेहाथ पकडले आहे. पुणे येथील एकता सहकारी सोसायटीच्या (धनकवडी) सभासदत्वावरून जुन्या आणि नवीन सभासदांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर सहकार विभागाने ही सोसायटी लिक्विडेशनमध्ये काढली होती आणि देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक केली होती. तक्रारदार (पुरुष, वय ६१, धंदा व्यापार) हे याच सोसायटीचे नवीन सभासद असून, त्यांनी व इतर ३२ सभासदांनी शेअर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अर्ज केला होता. या प्रलंबित कामासाठी, सप्टेंबर २०२५ मध्ये, तत्कालीन प्रशासक असलेल्या भास्कर पोळ यांनी तक्रारदाराकडे स्वतःसाठी व लिक्विडेटर देशमुख यांच्यासाठी ३ कोटी रुपये, तसेच भविष्यातील लिलाव प्रक्रियेत सोसायटीची जागा तक्रारदाराच्या व्यक्तीला देण्यासाठी ५ कोटी रुपये, असे मिळून एकूण ८ कोटी रुपयांची (रु. ८,००,००,०००/-) लाच मागितली.
या धक्कादायक मागणीनंतर तक्रारदारांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी एसीबीकडे तक्रार दिली । एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, ८ कोटींच्या लाचेची मागणी खरी असल्याचे निष्पन्न झाले आणि अॅडव्हान्स म्हणून ३० लाख रुपये (रु. ३०,००,०००/-) देण्याचे निश्चित झाले । ठरल्यानुसार, ५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी १८:५५ वाजता, पुणे येथील शनिवार पेठेतील तक्रारदारांच्या कार्यालयासमोर एसीबीने सापळा रचला । यावेळी आरोपी लिक्विडेटर विनोद देशमुख यांनी स्वतः तक्रारदाराकडून अॅडव्हान्स म्हणून ३० लाख रुपयांची लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली । लाचेची रक्कम स्वीकारताच, एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले आहे.
दोन्ही आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, सन १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे । ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजीत पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे । एसीबीने जनतेला आवाहन केले आहे की, कोणतेही शासकीय काम करून घेण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी होत असल्यास एसीबी पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा ।


