२७ जूनपासून राज्य विधिमंडळाचे मुंबईत पावसाळी अधिवेशन

मुंबई, निर्भीड वर्तमान:- राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, दि. २७ जून ते शुक्रवार, दि. १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. तर राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दि. २८ जून रोजी दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.

विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

पावसाळी अधिवेशन दि. २७ जून ते शुक्रवार, दि. १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार असून, एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार दि.२९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, असे या बैठकीत ठरविण्यात आलेले आहे.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version