ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकीय

महावितरण संबंधित प्रलंबित कामांचा तसंच नवीन कामांच्या प्रगतीची घेण्यात आली आढावा बैठक

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- माढा, करमाळा, अकोले, अहमदनगर, खेड, कोपरगाव, मोर्शी, कळवण, निफाड, वसमत, औंढा, बारामती आदी तालुक्यांमधील ‘महावितरण’शी संबंधित प्रलंबित कामांचा तसंच नवीन कामांच्या प्रगतीचा आढावा आयोजित बैठकीत घेण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांकडून होणाऱ्या वीजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीनं (महावितरण) प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार संबंधित भागातील उपकेंद्रांचं प्रलंबित काम पूर्ण करणे, उपकेंद्रांची क्षमतावाढ करणे आणि नवीन उपकेंद्र मंजूर करणे आदी कामं हाती घेऊन प्राधान्यानं पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

राज्यात सद्यस्थितीत सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत (RDSS) वितरण प्रणालीचे सक्षमीकरण व आधुनिकीकरणाची कामं हाती घेण्यात येत आहेत. याअंतर्गत नवीन उपकेंद्र उभारणं, उपकेद्रांची क्षमतावाढ, नवीन उच्चदाब वाहिन्या, नवीन वितरण रोहित्रे, विद्यमान वितरण रोहित्रांची क्षमतावाढ यासारखी कामं करण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी मागणी केलेली बहुतांश कामं यामधून पूर्ण करण्यात यावीत असेही सांगण्यात आले आहे.

माढा तालुक्यातील पडसाळी, अरण, भेंड, वरवडे, परीते, जाधववाडी येथे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे. घोटी व बावी येथे नवीन उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी येथे नवीन आणि माळशिरस तालुक्यातील जांबूड येथे अतिरिक्त उपकेंद्र मंजूर करण्यात आले. करमाळा तालुक्यातील वांगी येथे नवीन उपकेंद्र देण्यात येणार आहे, तर रायगाव येथील उपकेंद्राबाबत आकस्मिक निधीच्या उपलब्धतेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

खेड तालुक्यातील चिखलगाव व वाकी येथे नवीन उपकेंद्र तर कडूस येथे अतिरिक्त रोहित्र उभारणी करण्यात येणार आहे. कडूस येथे २२०/३३ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राच्या तांत्रिक प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरु आहे. मोर्शी तालुक्यातील तिवसाघाट व गणेशपूर (लिंगा) येथे नवीन उपकेंद्र बसवण्यासह रोहित्रांची क्षमतावाढ करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. वसमत तालुक्यातील आसेगाव व मुडी, औंढा तालुक्यातील पोटा खुर्द येथे नवीन उपकेंद्र केले जाईल, तशा सूचना देण्यात आल्या आहेत.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे महावितरणचे नवीन प्रशासकीय कार्यालय करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बारामती तालुक्यातील करंजे व कऱ्हावागज, इंदापूर तालुक्यातील निरवांगी, केडगाव विभागातील बोरीआंदी, कानगाव, सासवड विभागातील दिवे, न्हावी, शिवतक्रार (निरा) याठिकाणची उर्वरित कामं करण्याबाबतही चर्चा झाली.

अकोले तालुक्यातील मवेशी व पाडाळणे, संगमनेर तालुक्यातील घारगाव व नांदूर खंदमाळ, कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव, राहाता व चासनळी, कळवण तालुक्यातील कनाशी या उपकेंद्रांचा देखील आढावा घेतला आहे. या उपकेंद्रांचा समावेश सुधारित वितरण क्षेत्र योजनेत करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!