ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघात प्रतिबंधक उपाययोजनांसाठी १५ इंटरसेप्टर वाहने महामार्ग पोलिसांना हस्तांतरित

वर्तमान टाईम्स, वृत्तसेवा:- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर विहित वेगमर्यादेचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्फे एकूण १५ इंटरसेप्टर वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली आहे कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी झेंडा दाखविल्यानंतर सर्व वाहने समृद्धी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली.

७०१ कि.मी लांबीपैकी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समूद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर, ता. इगतपुरी (६०० कि.मी.) वाहतूकीस खुला झाला आहे. हजारो वाहने समृद्वीचा प्रति दिन वापर करीत आहेत. समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणे तसेच अपघातांना आळा घालण्यासाठी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी १५ महामार्ग पोलिसांच्या केंद्राकरिता इंटरसेप्टर वाहन उपलब्ध करून देण्याची विनंती महामंडळांकडे केली होती. त्याअनुषंगाने महामंडळाकडून १५ स्कॉर्पिओ वाहनांची खरेदी करण्यात आली. इंटरसेप्टर वाहनांसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपकरणांची जोडणी महामंडळातर्फे करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत ही वाहने अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या वेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवी फाटक, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह-व्यवस्थापकीय संचालक संजय यादव, सह – व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड व पोलीस अधीक्षक (महामार्ग पोलीस पथक) अरविंद साळवे, नरेश म्हस्के व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!