ताज्या घडामोडीपुणे

वाहतूक समस्या व उपाययोजनेसाठी वाहतूक विभाग व मनपा अधिकारी यांची झाली बैठक..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- मा. पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा यांचे कार्यालय येरवडा येथे माननीय आमदार श्री. सिध्दार्थ शिरोळे यांचे अध्यक्षतेखाली शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील वाहतूक समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत वाहतूक पोलीस, पुणे महानगरपालिकेकडील संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक नागरिक यांची बैठक काल दि. 28/06/2023 रोजी आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस श्री. गोंजारी, मुख्य अभियंता, पदपथ, पुणे मनपा, पुणे मनपाकडील पथ, अतिक्रमण विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, मलनिःसारण विभाग, उद्यान विभागाचे अधिकारी, टाटा मेट्रो, महामेट्रो, पी.एम. आर. डी. ए. कडील अधिकारी तसेच डेक्कन, शिवाजीनगर, चतुःश्रृंगी, खडकी परिसरात राहणारे ७० ते ८० नागरिक उपस्थित होते. बैठकीमध्ये नागरिकांनी त्यांना वाहतूकीच्या दृष्टीकोनातुन येणाऱ्या अडचणी उत्फुर्तपणे मांडल्या या अडचणींच्या अनुषंगाने सुमारे ४० तक्रारी अर्ज मा. आमदार महोदय यांना प्राप्त झाल्या होत्या व वाहतूक शाखेकडे पुढील कार्यवाहीस दिलेल्या होत्या. या अर्जापैकी १० अर्जांतील समस्यांचे निराकरण करण्यात आले होते. त्याप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांना उर्वरित तक्रारींबाबत तात्काळ उपाययोजना करणेबाबत सूचना देण्यात आल्या. चतुःश्रृंगी, खडकी परिसरातील रस्त्यांवर वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणणेकामी रम्बलर पट्टे बसविणेबाबत, आवश्यक त्या ठिकाणी नवीन सिग्नल व्यवस्था कार्यान्वीत करणे इ. बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

उर्वरित तक्रारी अर्जांचे उपाययोजनांचे पुर्ततेबाबत पुणे मनपाकडील संबंधित विभागास यापुर्वीच पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. यामध्ये दिप बंगला चौक, शिवाजीनगर एस.टी. स्टॅण्ड चौक, भाले चौक, मेडीपॉईंट चौक, आंबेडकर चौकातील समस्यांबाबत साकल्याने चर्चा करण्यात आली. वाहतूक शाखेकडील पोलीस अंमलदार व ट्राफिक वॉर्डन यांची नेमणुक करण्यात येणार आहे याबाबतही नियोजन करण्यात आले.

बैठकीसाठी उपस्थित नागरिकांनी वाहतूक शाखेतर्फे मा. आमदार यांचे अध्यक्षतेखाली अशा पध्दतीने प्रथमच वाहतूक शाखेतील अधिकारी, पुणे मनपाकडील अधिकारी यांचेसह बैठकीचे आयोजन करुन नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबत आश्वासन दिलेबाबत समाधान व्यक्त केले आहे.

वाहतूक शाखेकडील कर्तव्य पार करीत असताना उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदार नामे पोहवा सतिश सोनवणे, पोना रविंद्र शेडगे, पोशि सागर वाघमारे, पोहवा शिवाजी कुचेकर यांचे मा.आमदार श्री. सिध्दार्थ शिरोळे यांचे हस्ते प्रशंसापत्र देवून अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!